मसाप दक्षिण शाखेकडून गुरूवारी 26 रोजी हुतात्मा स्मृती मंदिर मध्ये कार्यक्रमाचे आयोजन
सोलापूर,(प्रतिनिधी)ः- स्वातंत्र्यवीर सावरकर आणि सद्य परिस्थिती या विषयावर ज्येष्ठ अभिनेते आणि सावरकर भक्त शरद पोंक्षे हे बोलणार आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर यांच्या वतीने या कार्यक्रमाचे गुरूवार दि. 26 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6.25 वाजता हुतात्मा स्मृती मंदिर मध्ये आयोजन करण्यात आल्याची माहिती अध्यक्षा रेणुका महागांवकर, कार्याध्यक्ष प्रशांत बडवे यांनी दिली.
हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य चळवळीत आपले आयुष्य खर्ची घालून मोलाचे योगदान देणारे तसेच मराठी भाषा समृध्द करणारे राष्ट्रभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या राष्ट्रभक्ती आणि स्वातंत्र्यपूर्व काळातील विविध घडामोडी तसेच स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सद्य परिस्थिती यावर अभिनेते शरद पोंक्षे हे सविस्तरपणे व्याख्यानाच्या स्वरूपात बोलणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या माध्यमातून समाजप्रबोधन आणि जनजागृतीसाठी अनेक उपक्रम राबवण्यात येतात दरवर्षी दिपावलीच्या निमित्ताने ज्येष्ठ निरूपणकार विवेकजी घळसासी यांची प्रवचनमाला, महाराष्ट्राचे प्रतिभावंत साहित्यिक कवी विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांच्या कथा, कवितांवर आधारीत विंदा एक स्मरणसाखळी हा बहारदार कार्यक्रम तसेच महाराष्ट्राचे सुपुत्र असलेले आणि दुबईत मसाला किंग म्हणून ओळख निर्माण करणारे धनंजय दातार यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम सोलापूरातील उद्योजकांना मार्गदर्शक ठरला. मसाप दक्षिण शाखेच्या अध्यक्षा रेणुका महागांवकर यांनी लेखन केलेल्या दोन पुस्तकाचे प्रकाशन अगदी थाटात करण्यात आले. त्यानंतर दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या वृत्तनिवेदिका, सुप्रसिध्द निवेदिका ज्योती आंबेकर यांचे भाषण कला शिबीर हे शिबीर आणि महिलांसाठी राज्यस्तरीय पाककला शिबीर त्याचबरोबर सोलापूरचे सुपुत्र असलेले राज्याच्या आणि देशाच्या राजकारणातील सोलापूरच्या सुपुत्रांच्या मुलाखतीचा कार्यक्रम सोलापूर रंगे नेत्यांच्या संगे, महाकवी गदि माडगुळकर यांच्या स्मृती निमित्त काव्य जागर कार्यक्रम, महिलांसाठी श्रावण महोत्सव, श्री सूक्त ते राष्ट्र सूक्त असे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यातूनच गुरूवार दि. 26 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6.25 वाजाता हुतात्मा स्मृती मंदिर मध्ये हा स्वातंत्र्यवीर सावरकर आणि सद्य परिस्थिती चे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून नागरीकांनी मोठ्यासंख्येने उपस्थिती राहावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले.