मुख्यमंत्री शिंदे यांचे मानले आभार !
सोलापूर : पत्रकारांच्या गृहनिर्माण प्रकल्पाच्या बाह्य सुविधांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र निवारा निधीतून 7 कोटींचा निधी मंजूर केला. त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
मंगळवारी, होम मैदान येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनीष केत, श्रमिक पत्रकार संघाचे सरचिटणीस सागर सुरवसे, खजिनदार किरण बनसोडे उपाध्यक्ष अफताब शेख, मराठी पत्रकार संघाचे खजिनदार अभिषेक आदेप्पा, ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार देशपांडे, राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य प्रमोद बोडके
आदींच्या हस्ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचा स्वामी समर्थांची मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला
पत्रकारांच्या गृहनिर्माण प्रकल्पाच्या बाह्य सुविधांसाठी सात कोटींचा निधी मिळावा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश गृहनिर्माण विभागाला दिले होते. गृहनिर्माण विभागाने म्हाडाकडून हा प्रस्ताव मागवून मान्यतेसाठी गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांच्याकडे पाठविला. सावे यांच्या मान्यतेनंतर सदरचा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठविण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली. हा निधी मिळावा म्हणून मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांच्या माध्यमातून तर उपमुख्यमंत्री फडणवीस आणि गृहनिर्माणमंत्री सावे यांच्याकडे आ. सचिन कल्याणशेट्टी, राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदू जोशी यांच्या माध्यमातून पाठपुरावा केल्यामुळे हा निधी मिळाला आहे.
या निधीतून नाला बांधकाम, संरक्षण भिंत, अंतर्गत रस्ते, भराई, पेव्हिंग ब्लॉक, पावसाळी गटार, मल निस्सारण वाहिनी, पाणीपुरवठा, रेन वॉटर हार्वेस्टिंग, पथदिवे, बाह्य विद्युतीकरण, सोलार सिस्टिम व अन्य कामे करता येणार आहेत. या निधीमुळे घरांच्या किमती कमी होण्यास मदत होणार आहे.