सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती
मुंबई दि. ८ – अयोध्येत राम जन्मभूमी मंदिर परिसरात महाराष्ट्र भक्त सदन उभारण्यासाठी राज्य शासनाने जूनमध्ये जमीन घेतली होती. या जागेवर पर्यावरण पूरक हरित इमारत (environmental friendly green building) बांधण्यात येणार आहे. या इमारत बांधणीचे भूमिपूजन आज महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण व उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. महाराष्ट्रातील जनतेसाठी हा आनंदाचा क्षण असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले.
जवळपास ९५०० चौरस मीटर क्षेत्रफळावर १२ मजली भव्य भक्त निवास उभे राहणार असून त्या ठिकाणी ६५० पर्यटक राहू शकतील. भक्त निवासात एकूण ४ व्हीआयपी कक्ष, ९६ खोल्या असून ४० डॉर्मिटरी बांधण्यात येणार आहेत. पुढील तीन वर्षात हे बांधून पूर्ण करण्यात येणार आहे. भक्तनिवास अयोध्येतील महत्त्वाच्या सर्व स्थळांपासून जवळ आहे. महर्षी वाल्मिकी विमानतळ पासून ११.५ किमी, श्रीराम जन्मभूमी मंदिर पासून ७.५ किमी तर अयोध्या रेल्वे जंक्शनपासून ४.५ किमीवर आहे.
श्रीरामाचे आणि महाराष्ट्राचे पौराणिक नाते असून श्रीरामाला गोदातीर पाहिल्यावर शरयू नदी तटाची आठवण झाली. त्यातूनच महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश यांच्यात धार्मिक आणि सांस्कृतिक नाळ जुळली. रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र हे समस्त भारतीयांसाठी धार्मिक आणि भावनिक असून महाराष्ट्रातील शेकडो स्वयंसेवक आणि करसेवक यांनी त्यासाठी प्रखर संघर्ष केला. श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाल्यावर महाराष्ट्रातील भाविकांसाठी जून महिन्यात अयोध्येत महाराष्ट्र भक्त निवास बांधण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून उभारण्यात येणारे हे महाराष्ट्र भक्त सदन म्हणजे याच भावनिक नात्याचे पुढचे पाऊल आहे असे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
या भूमिपूजन सोहळयासाठी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, अयोध्या हनुमान गढीचे महंत राजू दासजी महाराज, अयोध्येचे आमदार वेदप्रकाश गुप्ता, महापौर गिरीशपती त्रिपाठी, सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सचिव (रस्ते) सदाशिव साळुंखे, सचिव (इमारती) संजय दशपुते, मुख्य अभियंता राजेंद्र रहाणे, अधीक्षक अभियंता विवेक बडे, मुख्य अभियंता रणजित हांडे, अधीक्षक अभियंता प्रमोद बनगोसावी आदि मान्यवर उपस्थित होते.