सोलापूर –
तालुक्यातील शंकरनगर येथे असलेल्या मधुकर राठोड या सर्पमित्राने गेल्या दहा वर्षात सुमारे दहा हजार सापांना तसेच अनेक वन्य प्राण्यांना जीवदान दिले आहे. वन्यप्राण्यांचे संवर्धन करणाऱ्या सर्पमित्राच्या कार्याची वनविभाग व शासनाने दखल घ्यावी, अशी मागणी राठोड यांनी केली आहे.
साप हा शेतकऱ्यांचा मित्र असला तरी सापाबद्दल अनेक समज आणि गैरसमज आहेत. साप दिसला की, त्याला मारण्याकडे बहुतेकांचा कल असतो. परंतु सापांना वाचविण्यासाठी गावोगावी
सर्पमित्र तयार झाले आहेत. त्यापैकीच मधुकर राठोड हे एक आहेत. रात्री अपरात्री केव्हाही नागरिकांनी संपर्क साधला तर राठोड हे तत्काळ सापाला जीवदान देण्यासाठी धावून जातात. अनेक साप हे बिनविषारी असतात. तरीसुध्दा लोकांमध्ये भीती असते. त्यामुळे विषारी आणि बिनविषारी सापांबाबत जागृती झाली तर अधिक संख्येने सापांना जीवदान मिळू शकेल, असे राठोड यांनी सांगितले. कुत्री मागे लागून जखमी झालेले हरिण, तसेच ससा, घोरपड, कोल्हा, लांडगा, मांजामध्ये अडकलेले पक्षी, पाण्याच्या शोधात विहिरीत व शेततळ्यात पडलेल्या प्राण्यांनाही त्यांनी जीवदान दिले
आहे. गुरुवारी विंचूर येथील एका शेतात भला मोठा नाग होता. त्या नागाला कुत्र्याने अडविले होते. शेतकऱ्याच्या दृष्टीस ही बाब पडल्यानंतर त्याने राठोड यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर काही वेळात दाखल होऊन राठोड यांनी त्या नागाला सुरक्षितपणे पकडून त्याच्या अधिवासात सोडून दिले.
गेल्या दहा वर्षात नाग, धामीण, मण्यार, घोणस, कवड्या आदी जातींच्या सापांना पकडून राठोड यांनी त्यांच्या अधिवासात सोडून दिले आहे. साप आपल्या घराच्या परिसरात येऊ नये, त्यासाठी नागरिकांनी घराच्या आजूबाजूला स्वच्छता ठेवावी, दगडगोटे, फरशा यांचा ढीग पडला असेल तर त्यामध्ये लपण्यासाठी सापांना जागा मिळते. त्यामुळे त्यांची पैदास वाढते. रात्रीच्या वेळी घरातून बाहेर पडताना पायात बूट, हातात काठी, बॅटरी घेऊन बाहेर पडावे. जर साप आढळला तर त्याला न मारता ९७६७५५४०४७ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.