लग्नाचा बार अन् फुलांचा बाजार ; वधू वरांचे हार बनवण्यासाठी महिन्यापूर्वीच बुकिंग
सोलापूर – सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु झाला आहे. या लग्नसराईच्यावेळी फुलांची यासह हारांची मागणी नेहमीच वाढते. याला मुख्य कारण म्हणजे लग्नसोहळ्यांमध्ये फुलांचा वापर मुख्यतः मंडप सजावट, वरमाला, पुजेच्या वेळी, तसेच घर व हॉल सजावट यासाठी केला जातो. विशेषतः जास्वंद, मोगरा, गुलाब, झेंडू आणि यांसारख्या फुलांना अधिक मागणी असते. अती पाऊस झाल्याने तसेच थंडीच्या हंगामात फुलांची आवक कमी असल्याने बाजारात मागणी वाढल्याने मात्र आवक कमी असल्याने फुलांच्या आणि हारांच्या यंदाच्या किमतीत २० ते ३० टक्के महाग झाले असल्याचे विक्रेता कडून सांगण्यात आले.
फुलांच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. लग्नसराईमध्ये मोगरा, शेवंती, निशीगंध, निली, गुलाब, जरगीरा फुलांना मागणी आहे. हार बनवितांना या फुलांचा वापर केला जातो. हारमध्ये शेवंती, चिनी गुलाब, सांभा गुलाब, निशिगंधा, कमळ यांना मोठी मागणी आहे. गुलाब फूल बेंगलोर, मुंबई, पुणे येथून येतात. सोलापुरात सर्वात जास्त बेंगलोर व्हरायटी हाराला जास्त मागणी होत असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.
शहरात टिळक चौक, दत्त चौक, मधला मारुती, नवी पेठ, सात रस्ता यांसह विविध ठिकाणी पंचवीस हून अधिक फुल विक्रीची दुकाने आहेत. या दुकानांमध्ये फुले खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे. येथील फुलहार तयार करणाऱ्या दुकानदारांकडे महिनाभरापुर्वीच लग्नसोहळ्यासाठी लागणारे वधु-वरांचे हार तयार करण्यासाठीची बुकींग झाली आहे.
चौकट –
बाजारातील फुलांचे प्रति किलो (रू) दर –
सांभा गुलाब – १५० रू. किलो
शेवंती – १०० रू. किलो
चिनी गुलाब – ३५० रू. किलो
निशिगंधा – १५० रू. किलो
झेंडू – ३० रू. किलो
काकडा फूल – १२० रू. किलो
चौकट –
लग्नसराईसाठी बाजारपेठात मिळणाऱ्या हारांचे प्रकार आणि किंमती –
गुलाब पाईप हार, लाईट पाइप हार, गुलाब जिब्सो हार, मंठाळकर हार, तगरजाळी हार इत्यादी हार बाजारात आले आहेत. जवळपास ह्या हारांच्या किंमती ५०० रुपये पासून ते ८ हजार रुपयांपर्यंत आहेत. वधू वरांसाठी लग्नात मिळणाऱ्या सेट ची किंमत जवळपास १ हजार रुपये पासून ११ हजार रुपयांपर्यंत आहेत.
चौकट –
फुलांच्या किमतीत वाढ –
लग्नसराई आल्याने हारांसाठी, गुच्छ, गजरा, मंडप सजावट बनविण्यासाठी विक्रेत्यांची वाढती मागणी आणि फुलांचा तुटवडा यामुळे फुलांचे भाव जवळपास २० ते ३० टक्क्याने वाढले आहेत. वाढत्या थंडीमुळे बाजारात फुलांचा तुटवडा पडत आहे. परंतु लग्नसराई असल्याने ग्राहकांची वाढती मागणी पाहून फुलांच्या किमतीत वाढ झाल्याचे फूल विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे.
कोट –
लग्न सराई पाहता महिनाभरापुर्वीच लग्नसोहळ्यासाठी लागणारे वधु-वरांचे हार तयार करण्यासाठीची बुकींग झाली आहे. येतील तश्या मागणी नुसार हार बनवून देतो. सोलापुरात सर्वात जास्त बेंगलोर व्हरायटी हाराला जास्त मागणी होत आहे. परंतु, फुलांच्या वाढत्या किमतीमुळे हार, बुके, वर – वधू हार, गजरे यांच्या किमतीत वाढ झाली आहे.
विवेकानंद फुलारी, विक्रेता