सोलापूर – बाळे गावचे पाटील माणकोजीराव यांनी खंडोबाची बालकाच्या रूपात आपल्या देवघरात प्रतिष्ठापना केल्यामुळे त्या गावाला बाळे हे नामाभिधान प्राप्त झाले, अशी अख्यायिका आहे. माणकोजीरावांच्या घराण्यासह आता अनेकांचे कुलदैवत असलेल्या बाळेच्या खंडोबाची यात्रा आता सुरू होत असून,चंपाषष्टीपासून सुरु होणाऱ्या मार्गशीर्ष महिन्यात दर रविवारी बाळे मंदिरात भक्तांचा महापूर असतो.
माणकोजीराव पाटील यांच्या कुटुंबीयांचे श्री खंडोबा हे कुलदैवत आहे़ पाटील हे अणदूर येथील खंडोबास नित्यनियमाने पायी चालत जाऊन दर्शन व पूजाविधी करत असत़ त्यांची श्री खंडोबाचरणी निस्सीम अशी भक्ती होती़ काही कालावधीनंतर श्री खंडोबा हे पाटील यांच्या स्वप्नात आले अन् माझी आपल्या देवघरात स्थापना करून तेथेच पूजा, अभिषेक कर असे सांगितले़ त्यानुसार पाटील यांनी बाळाच्या रूपात आलेल्या खंडोबाची प्रतिष्ठापना केल्याची माहिती मंदिराचे प्रमुख मानकरी किशोर पाटील यांनी दिली.
चौकट –
सोलापूर – पुणे महामार्गावर सोलापूर शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर बाळे हे गाव आहे़ या गावात कुलदैवत श्री खंडोबाचे भव्य मंदिर आहे़ खंडोबा हे सोलापूरसह राज्यातील अनेक समाजबांधवांचे कुलदैवत आहे़ बाळे येथील खंडोबा मंदिरातील पुजारी व अणदूर येथील श्री खंडोबाचे पुजारी एकच असून, दोन्हीकडील मंदिरात नित्यनियमाने सारखीच पूजाअर्चा केली जाते़ या मंदिराची देखभाल करण्यासाठी स्थानिक ट्रस्टची नोंद केलेली आहे़ ते मंदिराचा सर्व कारभार पाहतात.
अशी आहे आख्यायिका –
श्री खंडोबाचा इतिहास असा सांगितला जातो की, बाळे येथील रहिवासी पाटील मंडळीचे श्री खंडोबा हे कुलदैवत आहे. ते अणदूर येथील खंडोबास नित्य नियमाने पायी चालत येऊन विधी करत असत त्यांची श्री खंडोबा चरणी निस्सीम असा भाव होता.नंतर काही श्री खंडोबाने पाटील यांच्या स्वप्नात जावुन माझी आपल्या देवघरात स्थापना करुन तेथेच पुजा अभिषेक करण्यास सांगितले आणि आणदूरचा खंडोबा श्री क्षेत्र बाळे येथे आला. आज ही येथील श्री चे पुजारी पाटील मंडळीच्या घरी जावुन त्यांच्या देवघरातील मूर्तीची पूजा करतात. (बाळ रुपात दर्शन दिल्यामुळे या गावाला बाळे असे नांव पडले)