प्रसाद दिवाणजी /
सोलापूर – महाराष्ट्रात खंडोबा आणि कर्नाटकात मैलार या नावाने ओळखला जाणारा हा लोकदेव कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अनुबंधाचे एक प्रकट प्रतीक आहे. ‘मल्लारी मार्तंड भैरव’ हे त्याचे संस्कृत नाव. या देवतेची लोकप्रियता एवढी व्यापक आहे की, धनगर, रामोशांपासून देशस्थ ब्राह्मणांपर्यंत समाजाच्या सर्व थरांत त्याची उपासना प्रचलित आहे.
‘खंडोबाचे नवरात्र’ हे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी असे सहा दिवस साजरे केले जाते. हा खरा षड्रात्रोत्सव असतो. मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजेच चंपाषष्ठी, या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणी-मल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रगट झाले. नवरात्राचे पाच दिवस उपवास करून सहाव्या दिवशी तो सोडतात. सहा दिवस देवापुढे नंदादीप ठेवतात. देवाला बेल, दवणा व झेंडूची फुले फार प्रिय म्हणून ती आठवणीने वाहतात.
श्री खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. मुख्यत्वे करून महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांत खंडोबाची उपासना जास्त केली जाते. खंडोबाचे नवरात्र हे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्टी असे सहा दिवस साजरे केले जाते. मार्गशीर्ष शुद्ध षष्टी म्हणजेच चंपाषष्टी या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणी-मल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रगट झाले. नवरात्राचे पांच दिवस उपवास करून सहाव्या दिवशी तो सोडतात. सहा दिवस देवापुढे नंदादीप ठेवतात. देवाला बेल, दवणा व झेंडूची फुले फार प्रिय आहेत म्हणून ती वाहतात.
चौकट –
ऐतिहासिक पलंग महाल –
बाळे येथील खंडोबा मंदिरात ऐतिहासिक पलंग महाल आहे पलंग महाल ही शिवकालीन पुरातन वस्तू आहे पलंगावर खंडोबा देवाचे चांदीचे आकर्षक व प्रसन्न मुखवटे आहेत. यात्राकाळात पालखीत खंडोबा देवाचे हे मुखवटे ठेवले जातात आणि छबीना मिरवणूक काढण्यात येत असते.
चौकट –
मंदिरात होणारे कार्यक्रम –
ब्राह्मण, गुरव, क्षत्रिय समाजातील लोकांच्या मुंज मंदिरात केल्या जातात. तसेच जागरण गोंधळ, जावळ काढणे, लंगर तोडणे, तळी उचलणे अशी विविध प्रकारची धार्मिक कार्यक्रम मंदिरात होत असतात.
चौकट –
मंदिराची स्थापना आणि वैशिष्ट्य –
श्री क्षेत्र खंडोबा मंदिराची तब्बल ७०० ते ८०० वर्षांपूर्वी स्थापना झाली आहे. हे मंदिर ऐतिहासिक आणि पुरातन काळातील मंदिर आहे. पुरातन काळातील हे
बांधकाम असल्याचे सांगण्यात आले आहे मात्र हे काळ्या दगडाच्या भिंती असणारे व तीन ते चार फूट रूंदीच्या भक्कम भिंती कोणी बांधल्या याचा उल्लेख नसल्याचे मंदिर समितीने सांगितले. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश मधील जवळपास ४० टक्के लोकांचे कुलदैवत आहे. नवीन संसाराची सुरुवात कुलदैवताच्या दर्शनाने करतात. परराज्यातून येणारी लोक श्री खंडेरायाला मनातील इच्छा सांगून भाग बांधतात आणि इच्छा पूर्ण झाल्यास ते भाग खंडेराया चरणी अर्पण करतात.
चौकट –
महाराष्ट्रात खंडोबा तर कर्नाटकात मैलार !
खंडोबा हा देव महाराष्ट्रात प्रसिध्द असला तरीही तो लगतच्या राज्यांतही, म्हणजेच कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणातही तितकाच प्रसिध्द आहे. अभ्यासकांच्या मते हा मूळचा कर्नाटकातील लोकदेव / ग्रामदेव. कर्नाटकात त्याचे नाव मैलार म्हणून ज्ञात आहे. साधरणतः इसवी सन 1000 पासून हा ग्रामदेव कर्नाटकात प्रसिध्द होवू लागला. मल्हार हा महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांचा लोकप्रिय असा कुलस्वामी (कुलदैवत) आहे. खंडोबाचेही ते एक नाव आहे. खंडोबा हा शंकराचा अवतार समजला जातो. मल्लासुर दैत्याचा संहार केला, मल्लाची हार झाली म्हणून मल्ल + हार अशा रितीने मल्हार हे नाव मिळाले असावे. “येळकोट येळकोट जय मल्हार” असा या देवाचा जयघोष केला जातो. मल्हारी मार्तंड (मल्लारिमार्तंड) असेही नामाभिधान आहे. मूळ संस्कृतमध्ये या नावाचा उच्चार “मल्लार” असा आहे.
चौकट –
श्री खंडोबाची महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशात एकूण १४ मुख्य स्थान आहेत.
श्री खंडोबाची महाराष्ट्रातील आठ प्रसिध्द स्थान
१. जेजुरी (जि.पुणे)
२. अणदूर – नळदुर्ग (जि.उस्मानाबाद)
३. बाळे (सोलापूर शहर)
४. निमगाव (जि.पुणे)
५. शेंगुड (जि. नगर)
६. पाली (जि.सातारा)
७. माळेगाव (जि.नांदेड)
८. सातारे (जि. औरंगाबाद)
श्री खंडोबाची कर्नाटकातील प्रसिध्द स्थान
१. आदी मैलार (बीदरपासून आठ किलो मीटर)
२. मंगसुळी (जि.धारवाड)
३. मैलारलिंग (जि.धारवाड)
४. मैलार – देवरगुड्ड (जि.धारवाड)
५. मैलार – मण्णमैलार (जि.बळ्ळारी)
आंध्रप्रदेश
1. यादगिर
कोट –
श्री क्षेत्र खंडोबा यात्रेस प्रारंभ झाला आहे, ३ राज्यातील अनेक लोकांचे खंडेराया कुलदैवत आहे. नागरिक मनोभावे दर्शन घेण्यासाठी पवित्र अश्या मार्गशीर्ष महिन्यात येत असतात. नवीन आयुष्याची सुरुवात खंडेरायाच्या दर्शनाने करतात. मनोभावे उपवास पकडतात, मनातील इच्छा, साकड देवा चरणी मागत असतात.
महाराष्ट्र, कर्नाटक तसेच आंध्रप्रदेशातून लोक दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात येत असतात. परराज्यातून येणाऱ्या नागरिकांसाठी सर्व सुविधा करण्यात आल्या आहेत. भाविकांसाठी दर्शन रांगेचे नियोजन करण्यात आले आहे. येणाऱ्या भाविकांनी मंदिर समितीकडून दिलेल्या पार्किंग मध्ये आपल्या गाड्या लावाव्यात असे आवाहन मंदिर समिती कडून करण्यात आले.
विनय ढेपे, अध्यक्ष, श्री क्षेत्र खंडोबा मंदिर, बाळे