१४ डिसेंबर रोजी लोकअदालतीचे आयोजन ; वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन
सोलापूर – वाहतुकीचे नियम तोडून वाहन चालविल्याप्रकरणी दंड आकारलेल्या वाहनधारकांना यापूर्वी वॉरंट समन्स बजावूनही ते न्यायालयात हजर झाले नाहीत, अशा ३०० जणांवर सोलापूर न्यायालयाकडून पुन्हा वॉरंट काढले आहे. हे वॉरंट बजावण्याची विशेष मोहीम प्रत्येक पोलिस ठाण्यांकडून सुरू आहे.
शहरातून वाहन चालविताना मर्यादित वेग, दुचाकीवर ट्रिपलसीट नको, विरुद्ध दिशेने वाहन चालवू नये, मद्यपान, ड्रिंक ॲण्ड ड्राईव्ह, कार चालविताना सीटबेल्टचा वापर, लेन कटिंग नको, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी किंवा मालाची वाहतूक नको, वाहन चालविण्याचा परवाना असावा, असे वाहतूक नियम आहेत. याशिवाय शहरातील सिग्नलवर थांबावे, सिग्नल तोडू नये, फॅन्सी नंबरप्लेट, सायलेन्सरमध्ये बदल, असेही नियम आहेत. तरीसुद्धा, अनेकजण वाहतूक नियम मोडून वाहन चालवितात. त्या बेशिस्त वाहनचालकांवर शहर वाहतूक पोलिसांकडून सातत्याने दंडात्मक कारवाई केली जाते.
सोलापूर शहरातील अशा बेशिस्त वाहन धारकांविरोधात १२ हजार नोटीसा कोर्टामार्फत काढण्यात आल्या आहेत. जवळपास ७ हजार समन्स काढले आहेत. समन्स प्राप्त होऊनही ज्या वाहन धारकांनी दंड भरला नाही अश्या ३०० वाहन धारकांचे वॉरंट काढण्यात आले आहे. अधिक वाहनचालकांना वाहतूक पोलिसांनी लोकअदालतीच्या अनुषंगाने नोटिसा पाठविल्या आहेत. त्यांना दंड भरावाच लागेल, अन्यथा नोटीस, समन्स बजावून देखील दंड न भरणाऱ्यांना वॉरंट काढले जाते. अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक शाखा सुधीर खिरडकर यांनी दिली आहे.
चौकट –
येत्या १४ डिसेंबर रोजी जिल्ह्यात लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या वाहनधारकांवर वाहतूक नियम मोडल्याने दंडात्मक कारवाई झाली, त्यांनी लोकअदालतीत येऊन दंड भरावा. त्यापूर्वी त्या वाहनधारकांना शहर वाहतूक पोलिसांच्या कार्यालयात किंवा वाहतूक पोलिसांच्या माध्यमातूनही दंडाची रक्कम भरावी आणि अटक होण्यापासून वाचावे असे आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक शाखा सुधीर खिरडकर यांनी केली आहे.
चौकट –
३०० बेशिस्त वाहन धारकानंविरोधात निघाले वॉरंट –
सोलापुरातील वाहतुकीचे नियम भंग केलेल्या वाहन धातकांविरोधात तब्बल ७ हजार समन्स काढण्यात आले आहेत. परंतु समन्स प्राप्त होऊनही ज्यांनी दंड भरला नाही अश्या ३०० वाहन धारकांचे वॉरंट काढण्यात आले आहेत. त्यातील ११० लोकांनी दंड भरल्याने आता ते कायदेशीर कारवाई पासून प्रवृत्त झाले आहेत.
वॉरंट निघूनही पैसे न भरल्यास होणार न्यायालयीन कस्टडी – ज्या बेशिस्त वाहन धारकांना समन्स प्राप्त झाले आहे त्यांनी दंड भरावा अन्यथा वॉरंट निघू शकते, परंतु वॉरंट निघूनही ज्या लोकांनी दंड भरला नसेल त्यांना न्यायालयीन कस्टडी ला सामोरे जावे लागणार आहे. नोव्हेंबर महिन्यातील झालेल्या कारवाईत लोकांनी वॉरंट चे पैसे न भरल्याने ३ लोकांना कस्टडी झाली आहे.
नागरिकांना आवाहन –
ज्या वाहन धारकांना नोटीस, समन्स प्राप्त झाले आहेत त्यांनी आपला दंड भरून कायदेशीर कारवाई पासून परावृत्त व्हावे. कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्यापेक्षा दंड भरणे सोयीचे आहे. कोणत्याही ठिकाणी ट्रॅफिक कर्मचारी दिसल्यास दंड भरू शकता, इतर शहरातून ही हा दंड स्वीकारला जातो. नियम माहिती असूनही जनतेकडून त्याचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागते. सर्वसामान्य नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे आणि स्वतः सुरक्षित राहावे इतरांनाही सुरक्षित ठेवावं असे आवाहन वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.