सोलापूर – अनेक वर्षांपासून पोलीस ठाण्याच्या आवारात पडून असलेल्या बेवारस विविध गुन्ह्यातील वाहतूक,पोलिसांनी केलेल्या कारवाईतील शेकडो वाहने बेवारस अवस्थेत सोलापूर तालुका पोलिस ठाण्याच्या आवारात पडून आहेत. ही वाहने ज्या वाहन मालकांची आहेत, त्यांनी ओळख पटवून घेऊन जावीत अन्यथा पुढील कायदेशीर मार्गाचा अवलंब करून निर्गत करण्यात येणार असल्याची माहिती सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी दिली.
सोलापूर तालुका पोलिस ठाण्याच्या आवारात ४ चारचाकी वाहने व ६७ दुचाकी वाहने गेल्या काही वर्षांपासून बेवारस स्थितीत आहेत. चारचाकी वाहनामध्ये एक राखाडी रंगाची कार, बॉडी नसलेले तीन मालट्रक, एक बारा टायर असलेला मालट्रक व पिवळ्या रंगाचा जे. सी. बी. धूळखात पडलेला आहे. ज्या कोणाची ही चारचाकी, दुचाकी वाहने असतील त्यांनी त्यांच्या मालकी हक्काचे पुरावे, कागदपत्र घेऊन सोलापूर तालुका, पोलिस ठाणे येथून ओळख पटवावी. या बेवारस अवस्थेत असलेली चारचाकी, दुचाकी वाहने पोलिस ठाण्याच्या आवारात अस्ताव्यस्त पडून असून, मालकी हक्काची ओळख पटत नसल्यामुळे वाहनांची निर्गत करण्यास विलंब होत असल्याचे पोलिसांनी सांगितले. ठाणे परिसरात बेवारस अवस्थेत पडलेली वाहने समक्ष येऊन पाहावीत, ज्यांची वाहने आहेत त्यांनी वाहनाची उपलब्ध कागदपत्र घेऊन यावे. कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर वाहन परत करण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
बेवारस वाहनांसंदर्भात आवाहन केले आहे. आवाहन करूनही वाहनांचे हक्क सांगणारे कोणीही न आल्यास त्या वाहनांचे कोणीही मालक नसल्याचे गृहीत धरून बेवारस वाहनांची पुढील योग्य त्या कायदेशीर मार्गाचा अवलंब करून निर्गत करण्यात येणार आहे.
राहुल देशपांडे, पोलिस निरीक्षक, सोलापूर तालुका पोलिस ठाणे