सोलापूर : सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास सोलापूर- तुळजापूर रोडवरील डी-मार्टजवळ कारंबा नाका परिसरात तुळजापूर आगाराच्या एका बसगाडीवर (एमएच ११, बीएल ९३६१) दोघांनी दगड मारला. तुळजापूरहून ही धाराशिव विभागाची बस सोलापूरच्या दिशेने येत होती.
चालक दीपक तानाजी जाधव, वाहक संजय किशनराव काटे यांनी या प्रकरणी फौजदार चावडी पोलिसांत फिर्याद दिली आहे. सोलापूर-सातारा बसच्या समोरील काचेवर देखील काहींनी दगड मारुन काच फोडली. या प्रकरणी फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
सोमवारी तुळजापूर आगाराची बस तुळजापूर ते सोलापूर या मार्गावर धावत असताना कारंबा नाका परिसरात दुपारी बसच्या डाव्या बाजुला प्रवाशाच्या दरवाजावरील काचेवर दोघांनी दगड मारले. त्या दगडाने काच फुटून दोन प्रवाशांना किरकोळ जखम झाली आहे. या प्रवाशांना उपचारासाठी घेऊन जात असताना ते स्वतः उपचार करतो म्हणून परस्पर निघून गेले. या घटनेमध्ये तुळजापूर आगाराच्या बसचे अंदाजे दोन हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. जोडभावी पेठ पोलिस त्या दोन अज्ञात व्यक्तींचा शोध घेत आहेत.
परभणीतील घटनेच्या निषेधार्थ काही संघटनांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळपासून सोलापूर शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात पोलिसांचा बंदोबस्त लावल्याचे दिसून आले. दरम्यान, तुळजापूर आगाराच्या बसवर आणि सोलापूर-सातारा या बसवर काही अज्ञात तरुणांनी कारंबा नाका परिसरातील त्या रोडवर दगडफेक केली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या त्या तरुणांचा शोध पोलिस घेत आहेत. या घटनेनंतर सोलापूर शहरातील मुख्य बस स्थानकावर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता.