परभणीतल्या हिंसाचाराची सी.बी.आय. चौकशी करावी – राजा सरवदे
सोलापूर –
परभणी येथील घटनेचे पडसाद राज्यभरात तसेच सोलापूर शहरात देखील उमटत आहेत. परभणी मध्ये घडलेल्या संविधान विटंबना घटनेच्या निषेधार्थ सोलापुरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष राजा सरवदे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून तीव्र निषेध नोंदवण्यात आला. सोलापुर शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकापासून निघालेला हा मोर्चा श्रीसिद्धेश्वर मंदिर, पासपोर्ट कार्यालय, सिद्धेश्वर प्रशालेमार्गे जिल्हा परिषदेच्या पूनम गेट समोर येऊन थडकला.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्यावतीने विविध घोषणा देत जोरदार निदर्शने करण्यात आली.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहराध्यक्ष अतुल नागटिळक यांनी याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान संपूर्ण देशाचे असताना त्या संविधानाच्या रक्षणासाठी केवळ आंबेडकरी समाजात रस्त्यावर उतरतो हे दुर्दैव आहे असे सांगतानाच घटनेची तात्काळ चौकशी करून संबंधित आरोपींना शिक्षा व्हावी अन्यथा रिपाइ यापेक्षाही तीव्र आंदोलन करेल असा इशारा दिला.
दरम्यान, परभणी घटनेचे पडसाद आता राज्यभर उमटू लागले आहेत समाजातून तीव्र प्रतिक्रिया समोर येत आहे सोलापुरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांच्या वतीने मोठा बंदोबस्त जिल्हा परिषदेच्या समोर लावण्यात आल्याचे पाहायला मिळाले. याप्रकरणाची सी.बी.आय. मार्फत चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर व पोलीस गुंडांवर कायदेशीर कारवई करण्यात यावी. याप्रसंगी प्रदेश अध्यक्ष राजा सरवदे, प्रदेश उपाध्यक्ष के. डी कांबळे, शहर समन्वयक अतुल नागटिळक, शहर समन्वयक शाम धुरी, शहर समन्वयक पवन थोरात, शहर समन्वयक, राजेश उबाळे शहर समन्वयक, सुशिल सरवदे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते आणि भीमसैनिक उपस्थित होते.
कोट –
परभणीतल्या हिंसाचाराची सी.बी.आय. चौकशी करावी.
महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागातील परभणी येथे मुख्य चौकात असलेल्या, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याच्या (उद्देशिक ) प्रतिकृतीची विटंबना केली. त्यामुळे परभणी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर बौध्द वस्तीत भिमनगर, प्रियदर्शीनगर इत्यादी विभागात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर कोंबींग ऑपरेशन करून बौध्द बांधवांना मोठ्याप्रमाणात मारहाण केली. सोबतच त्यांच्या घराची, मोटार सायकली, कारची पोलीसांनी नुकसान केले. अनेक निष्पाप नागरिकांना पोलीसांनी बेकायदेशीर अटक केल्याचे समजते.यामध्ये विधि विभागाचा पदवीधर भिमसैनिक, दिवंगत सोमनाथ व्यंकटेश सुर्यवंशी याचा पोलीस मारहाणीत, कोठडीत मृत्यु झाला. अनेक महिलांना आणि शालेय, कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर चुकीच्या पध्दतीने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
राजा सरवदे, प्रदेशाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट.