सोलापूर येथील हिप्परगा तलाव परिसरात अर्धरंगहीन अर्थात ल्युसिस्टीक प्रकारच्या मादी माळचिमणी (Ashy crowned Sparrow lark) पक्ष्याचे नुकतेच दर्शन झाले आहें. यापूर्वी सोलापुरातच बोरामणी परिसरात अशाच अर्धरंगहीन नर माळचिमणीची नोंद 2019 आणि 2020 मध्ये पक्षीअभ्यासक श्री. शिवानंद हिरेमठ सरांनी केली आहे. सरांच्या अभ्यासानुसार सोलापुरात अर्धरंगहीन चिमणी, सातभाई, गुलाबी चटक, सुगरण, कोतवाल या पक्ष्यांची देखील नोंद झाली आहे. तसेच सोलापुरात अशाच एका खोकडाची देखील नोंद हिरेमठ सरांनी 2022 मध्ये केली आहे. एकाच ठिकाणी इतक्या प्रजातींमध्ये अर्धरंगहीनतेसारखी दुर्मिळ बाब निदर्शनास येणे हा अतिदुर्मिळ योग आहे.
अर्धरंगहीन अर्थात ल्युसिसीझम ही एक प्रकारची जनुकीय विकृती असून यामध्ये अनपेक्षित जनुकीय बदलांमुळे प्राण्यांच्या शरीरातील रंग तयार करणाऱ्या घटकांच्या अभावामुळे अनियमित आकाराचे पांढरे डाग शरीरावर आढळून येतात, त्याचवेळी शरीराच्या इतर भागाचा रंग हा सामान्य असतो. असे जनुकीय बदल क्वाचितप्रसंगी नैसर्गिक, मानवी हस्तक्षेपाने ठराविक रंगासाठी घडवून आणलेले प्रजनन किंवा बऱ्याचदा प्रदुषणाच्या गंभीर परिणामांमुळे देखील आढळून येऊ शकतात. हे जनुकीय बदल शक्यतो प्राण्याच्या भ्रूण अवस्थेतील वाढीच्या दरम्यान काही विशिष्ट रसायने वा प्रदूषके यांच्या संपर्कात आल्यामुळे रंग तयार करण्यास कारणीभूत असणाऱ्या Melanin घटकाच्या उत्पादन किंवा वितरणतील आभावामुळे घडून येऊ शकतात, असे भारतीय वन्यजीव संस्थान चे प्रकल्प समन्वयक प्रसाद बोलदे यांनी सांगितले.
सदर मादी पक्ष्याची प्रथम नोंद नागेश राव, प्रशांत पाटील, नरेंद्र पंडित, अयुब पत्तेवाले यांनी हिप्परगा तलाव परिसरात केली असून सोलापुरातील अनुभवी पक्षी अभ्यासक व निरीक्षक सचिन पाटील, संतोष धाकपाडे, प्रसाद बोलदे यांनी देखील याची नोंद केल्याचा दुजोरा दिला आहे.