प्रतिनिधी,
अंत्रोळी दक्षिण सोलापूर येथील लक्ष्मी मंदिरात चमत्कार झाला अशा चर्चा सुरू झाल्या. एका उभ्या दगडावर फक्त शेंदूर फासलेले एक देवीचे छोटेसे मंदिर आहे. त्या देवीला रात्रीतून डोळा आला अशी चर्चा सुरू झाली. चमत्कार घडला, देवी जागृत झाली आहे, तिने 1 डोळा उघडला आहे, कौल दिला आहे, नवरात्रीत दुसरा डोळा सुद्धा येणार आहे, मोठे मंदिर बांधले पाहिजे, यात्रा काढली पाहिजे अशा असंख्य अफवा पाहता पाहता सर्वदूर पसरल्या.
आजू बाजूच्या गावतूनही लोक दर्शनासाठी येवून गर्दी करू लागले. पाहता पाहता तिथे खण, नारळ, नेवेद्य इ चा ढीग होवू लागला. त्या देवीचा तो डोळा असलेला फोटो बघता बघता सोशल मीडिया वर वायरल झाला. अंधश्रद्धा निर्मुलन समिती सोलापूर शहर शाखेस सदर बातमी कळताच त्यांनी अंत्रोळी येथे जावून गावकऱ्यांचे प्रबोधन करायचे ठरविले. त्याच बरोबर त्यांनी सोलापूर ग्रामीण पोलिस उपअधिक्षक विजयालक्ष्मी कुर्री यांना सदर घटनेची माहिती दिली. अधीक्षकांनी अनिस सोबत मंद्रुप पोलीस सहकार्यासाठी सोबत देण्याचे आश्वासन दिले.
मंद्रूप पोलीस स्टेशनमधील श्रीकांत बुर्जे आणि आयेशा फुलारी हे पोलीस अनिस टीम सोबत सदर ठिकाणी गेले. अनिस ची टीम सदर मंदिरात जाताच हळूहळू गावकऱ्यांची गर्दी झाली. प्रथम झाला प्रकाराबद्दल सखोल चौकशी करून नेमके काय कसे झाले हि माहिती काढण्यात आली. एका लहान मुलाने प्रथम देवीला डोळा आला असे पाहून सर्व गावकर्यांना सांगितले आणि हि अफवा पसरली. पुजाऱ्याने दुसऱ्या बाजूला सुद्धा खपली निघत आहे, तेथेही डोळा येईल असे सांगितले.
सर्वांचे ऐकून घेतल्या नंतर गावकऱ्यांना समजावून सांगण्यात आले कि कोणतीही गोष्ट अपोआप चमत्काराने घडत नसते. प्रत्येक गोष्टीच्या मागे काहीतरी कार्यकारण भाव हा असतो. हा डोळा आपोआप आलेला नसून तो खोडसाळपणे कोणीतरी चिकटविला आहे. हा चमत्कार नाही. दुसऱ्या बाजूला असलेली खपली दुसरा डोळा येणार असल्याची खुण नसून फासलेल्या शेंदुराचा पापुद्रा आहे. जर कोणी हा चमत्कार आहे असा दावा करीत असेल तर त्यांनी अनिस ला ते लेखी द्यावे, आम्ही योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यास तत्पर आहोत. असे सांगताच कोणीही पुढे आले नाही. बहुसंख्य नागरिकांनी हा चमत्कार नसून खोडसाळपणाने कोणीतरी हा डोळा चिकटवला असे सांगितले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती सोलापूर शहर शाखेचे कार्यकर्ते प्रा शंकर खलसोडे, मानसोपचारतज्ञ डॉ अस्मिता बालगावकर, उषा शहा, निशा भोसले, अंजली नानल, ग्रंथमित्र कुंडलिक मोरे, इतिहासतज्ञ नितीन अन्वेकर, पत्रकार सिद्धार्थ परिट, ब्रम्हानंद धडके इ कार्यकर्ते उपस्थित होते.
चौकट : – पुजारी: अफवा खोटी आहे : शेवटी पुजाऱ्याने कबुल केले कि इथे कोणताही चमत्कार नाही. हि अफवा आहे. देवी जागृत झाली, प्रसन्न झाली, कौल दिला असे काहीही आमचे म्हणणे नाही.
चौकट :- डॉ अस्मिता बालगावकर : कोणत्याही प्रकारच्या चमत्काराचा दावा करणे हे जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन कायद्या अंतर्गत कायदेशीर गुन्हा आहे. असा कोणीही दावा करीत असल्यास त्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
चौकट :- इतिहासतज्ञ नितीन अन्वेकर : या मंदिरात कोणत्याही प्रकारची देवीची मूर्ती नसून तो फक्त एक उभा ओबड धोबड शेंदूर फासलेला दगड आहे ज्यात कुठेही पुरातन भारतीय स्थापत्य शैली म्हणून काही आढळत नाही. अशा दगडाला अनेकदा तांदळा म्हणले जाते. कोणीतरी हा डोळा चिकटवलेला दिसतोय. त्यामुळे कोणीही यावरून अफवा पसरवू नये.