सोलापूर प्रतिनिधी –
खासदार झाल्यानंतर प्रथमच मंगळवेढा दौऱ्यावर आलेल्या प्रणिती शिंदेंचा ‘टमटम’मधून प्रवास.!
मंगळवेढा तालुक्यातील खोमनाळ येथील ग्रामदैवत कामसिद्ध देवाची यात्रा भरली होती. कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे कामसिद्ध देवीच्या दर्शनासाठी प्रथमच खासदार झालेल्या प्रणिती शिंदे यांनी हजेरी लावली होती.
सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे प्रथमच बुधवारी (ता. १२ जून ) मंगळवेढा दौऱ्यावर आल्या होत्या. या दौऱ्यात प्रणिती शिंदे यांनी चक्क ‘टमटम’मधून (छोटा टेंपो) केलेला प्रवास चर्चेचा विषय ठरला आहे.
प्रणिती शिंदे यांनी खोमनाळ येथील ग्रामदैवत कामसिद्ध देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आमदार प्रणिती शिंदे विजयी होणार की आमदार राम सातपुते विजय होणार यावर दहा हजार रुपयांची शर्यत लागली होती. त्यात खोमनाळ येथील मच्छिंद्र इंगोले यांनी प्रणिती शिंदे जिंकतील, असा दावा केला होता.
निकालानंतर सोलापूरमधून प्रणिती शिंदे जिंकल्याचे स्पष्ट झाले. ही शर्यत जिंकणारे मच्छिंद्र इंगोले यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. देवीच्या पालखीची मिरवणूक सुरू झाल्यानंतर शिंदे यांनी पालखीचे दर्शनही घेतले. पालखी दर्शनानंतर काही कार्यकर्त्यांनी चहापानासाठी प्रणिती शिंदे यांना घरी येण्याचा आग्रह केला. खासदार शिंदे यांनीही कार्यकर्त्यांना आग्रह न मोडता त्यांची इच्छा पूर्ण केली.
छोटा टेंपो असल्यामुळे चालकानेही गर्दीतून वाढत काढत प्रणिती शिंदे यांना काँग्रेस कार्यकर्ते सुधाकर कांबळे यांच्या घरापर्यंत पोचवले. शिंदे यांनीही कार्यकर्त्याला न दुखावत त्यांची इच्छा पूर्ण केली. प्रणिती शिंदे यांनी आपली गाडी सोडून दुधाच्या गाडीतून केलेला हा प्रवास मंगळवेढ्यात चर्चेचा ठरला आहे.
अलीकडच्या काळात राजकीय नेते शक्यतो आपल्या किंवा कार्यकर्त्यांच्या मोटारीतूनच प्रवास करतात. पूर्वी काही आमदार हे एसटी बसधून प्रवास करायचे. मात्र, आता हे चित्र दुर्मिळ झाले आहे. पण, मंगळवेढ्याच्या दौऱ्यावर आलेल्या खासदार प्रणिती शिंदेंनी दुधाच्या गाडीतून केलेला प्रवास चर्चेत आला आहे.
काँग्रेस कार्यकर्ते सुधाकर कांबळे यांच्या घरापर्यंत जाण्यासाठी पुरेसा रस्ता नव्हता. खासदार शिंदे यांची गाडी कांबळे यांच्या घरापर्यंत जात नव्हती. गर्दीतून मोटारीसाठी वाट काढणे, अडचणी ठरू लागले, त्यावेळी मंगळवेढ्यावरून निंबोणीकडे जाणाऱ्या दुधाच्या गाडी चालकाला हात करून काँग्रेस कार्यकर्ते सुधाकर कांबळे यांच्या घरापर्यंत सोडण्याची विनंती केली.