विद्यार्थ्यांनी आवडीचे शिक्षण घेऊन करिअर करावेः आ. सुभाष देशमुख
लोकमंगल फौंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
सोलापूर प्रतिनिधी –
सोलापूर हे वैभवशाली होण्यासाठी नवीन पिढीने अभ्यास करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचे शिक्षण घेऊन त्यात करिअर करावे. स्वतः कमवून शिक्षण घेण्यासाठी प्रयत्न करावेत. विद्यार्थ्यांच्या नावे पालकांची ओळख व्हावी, यासाठी विद्यार्थ्यांनी मनापासून अभ्यास करावा तसेच पालकांनीही विद्यार्थ्यांना समजून घ्यावे, असे प्रतिपादन आ. सुभाष देशमुख यांनी केले.
लोकमंगल फौंडेशन व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या संयुक्त विद्यमाने दहावी गुणवंत विद्यार्थी व निवृत्त शिक्षकांचा सत्कार सोहळा शनिवारी शिवस्मारक येथे पार पडला, त्यावेळी आमदार सुभाष देशमुख बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी शिक्षणाधिकारी सचिन जगताप डॉ. माजी प्रभारी कुलगुरू गौतम कांबळे, आयएएस परीक्षा पास स्वाती राठोड आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात एकूण 27 निवृत्त शिक्षक व 187 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी स्वाती राठोड यांनी त्यांना आयएएस परिक्षेत कसे यश मिळाले याविषयी आपले अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकमंगल फौंडेशनचे संचालक व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे संघटन मंत्री मारुती तोडकर यांनी केले व आभार प्रदर्शन शिक्षक परिषदेचे शहर अध्यक्ष मोहन पाटील यांनी केले. या कार्यक्रमाला लोकमंगल फौंडेशनचे संचालक महेश नलावडे, शिक्षक परिषदेचे विभागीय अध्यक्ष सुरेश राठोड, विश्वनाथ कुलकर्णी, नवनाथ नाईकवाडी, बाळासाहेब शिंगाडे, परमेश्वर गायकवाड, अरविंद बिदरकोटे, बाबुराव माने, सोमनाथ राठोड, विठ्ठल लोहार व पदाधिकारी उपस्थित होते.
सुसंस्कृत मुलांनी राजकारणात यावे
आजकाल राजकारण्यांवर टिका होते. मात्र सुसंस्कृत मुले राजकारणात आली तर देशाचे कल्याण होईल. अशा मुलांकडून राष्ट्रसेवा आणि राज्य सेवा चांगली होईल, असेही आ. सुभाष देशमुख म्हणाले.