सोलापूर प्रतिनिधी –
श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडून आपल्याला अडचण करण्याचा प्रयत्न काही मंडळींनी केला. त्यांना बाजूला सारून विकासाच्या कामासाठी एकजूट दाखवून द्यायची आहे. लोकसभेप्रमाणे आगामी काळात विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही आपली एकजूट कायम ठेवून काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी यांनी केले.
कुमठे येथील श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी गेल्यावर्षी 15 जून रोजी पाडण्यात आली होती. त्यामुळे हा दिवस काळा दिवस म्हणून पाळण्यात आला. या पार्श्वभूमीवर कारखाना कार्यस्थळावर आयोजित कार्यक्रमात काडादी बोलत होते. नूतन खासदार प्रणिती शिंदे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष अण्णाराज ऊर्फ पुष्पराज काडादी हे होते.
काडादी पुढे म्हणाले, श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडून एक वर्ष झाले. मात्र, अद्याप विमानसेवा सुरू झाली नाही. त्यावरून चिमणी पाडण्यामागे कारखाना अडचणीत आणण्याचा भाजपच्या लोकांचा हेतू उघड झाला आहे. त्यामुळे भविष्यात आपण एकजुटीने त्यांचा डाव हाणून पाडू. केवळ कारखाना नव्हे तर उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील पाण्याच्या प्रश्नासह विकासाच्या इतर समस्या सोडविण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न करण्याची ग्वाही काडादी यांनी दिली. राजकीय आकसातून चिमणी पाडल्याबद्दल भाजपचा आणि प्रशासनाचा यावेळी निषेध करण्यात आला.
यावेळी बोलताना नूतन खासदार प्रणिती शिंदे यांनी, भापजच्या सूडबुध्दीच्या राजकारणाचा काडादी यांना त्रास होत असल्याचे सांगितले. आगामी काळात सोलापूरच्या विकासासाठी आपण सदैव धर्मराज काडादी आणि श्री सिध्देश्वर परिवार यांच्यासोबत राहणार असल्याची ग्वाही दिली.
याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष सिध्दाराम चाकोते यांनी चिमणी पाडकाम करताना प्रशासनाने केलेल्या मुजोरीच्या आणि चिमणी वाचविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांच्या आठवणी सांंगितल्या. ज्येष्ठ सभासद हरीश कुलकर्णी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कामगार युनियनचे जनरल सेक्रेटरी अशोक बिराजदार यांनी केले.
या काळा दिन कार्यक्रमास संचालक गुरुराज माळगे, शिवशंकर बिराजदार, अमर पाटील, विलासराव पाटील, मल्लिकार्जुन बिराजदार, विद्यासागर मुलगे, शिवानंद बगले (पाटील), अरुण लातुरे, सिध्दाराम व्हनमाने, स्वीकृत संचालक हरिश्चंद्र आवताडे, महादेव जम्मा, कार्यकारी संचालक रवींद्र पाटील, सिध्देश्वर देवस्थान पंचकमिटी सदस्य रतन रिक्के, प्रभुराज मैंदर्गी, माजी संचालक बाळासाहेब बिराजदार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे दिनेश शिंदे, सिद्रामप्पा मुलगे, बिपिन करजोळे आदी मान्यवरांसह कारखान्याचे सभासद, अधिकारी, कर्मचारी, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कारखान्याच्या सर्व कर्मचार्यांनी काळी फीत लावून चिमणी पाडण्याचा निषेध केला.
सिध्देश्वर परिवाराचे आभार – खा. शिंदे
साखर कारखान्याची चिमणी पाडून वर्ष झाले तरी अद्याप विमानसेवा सुरू झाली नाही. वास्तविक पाहता होटगी रोड विमानतळावरून विमानसेवेसाठी खूप मर्यादा आहेत. त्यामुळे आपण बोरामणी विमानतळासाठी प्रयत्नशील असल्याचे नूतन खासदार प्रणिती शिंदे यांनी स्पष्ट केले. आपल्या विजयात धर्मराज काडादी आणि श्री सिध्देश्वर परिवाराचे योगदान मोठे आहे. त्याबद्दल आपण श्री सिध्देश्वर परिवाराचे आभारी आहोत, असे शिंदे यांनी सांगितले. काडादी यांनी प्रथमच उघड राजकीय भूमिका घेतली. त्यांच्यामुळे आपला लढा यशस्वी झाल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. काडादी यांच्यासारख्या कर्तृत्ववान आणि विकासाची दृष्टी व तळमळ असलेल्या नेत्यांची आज अधिक गरज असून धर्मराज काडादी यांनी प्रत्यक्ष राजकारणात यावे, असा प्रणिती शिंदे यांनी आग्रह करताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
शिंदे यांच्या विजयात योगदान असल्याचे समाधान – काडादी
लोकसभा निवडणुकीत प्रणिती शिंदे यांच्या विजयात आपल्या श्री सिध्देश्वर परिवाराचे योगदान असल्याचे समाधान आहे. प्रणिती नेहमीच अडचणीच्या वेळी मदतीला धावून येणार्या आहेत. त्यांना विकासाची दृष्टी आहे. कुरघोडीचे आणि सूडबुध्दीचे राजकारण न करता सर्वांना सोबत घेऊन जाणार्या त्या नेत्या आहेत. भविष्यातही आपल्यासोबत असल्याचा विश्वास त्यांनी दिला आहे. एकजूट दाखवून शिंदे यांना विजयी केल्याबद्दल धर्मराज काडादी यांनी श्री सिध्देश्वर परिवाराचे आभार मानले.
ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, विजयसिंह मोहिते पाटील, उध्दव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले या महाविकास आघडीच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या परिसराच्या विकासासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याची ग्वाही काडादी यांनी दिली.