लिंगायत संघर्ष यात्रेचे संयोजक एड. ताकबीडकर यांचा सवाल
सोलापूर : मंगळवेढा येथे महात्मा बसवेश्वर महाराज यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यात यावे ही मागणी प्रलंबित आहे. दहा वर्षांपूर्वी निधीची घोषणा करण्यात आली मात्र स्मारकाच्या नावाने एक वीटही उभारली नाही. हे स्मारक कधी उभारणार असा सवाल लिंगायत संघर्ष यात्रा संयोजन समितीचे प्रमुख एड. निळकंठ ताकबीडकर यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ऍड.निळकंठ ताकबीडकर यांच्या नेतृत्वाखाली दि. 10 ते 13 ऑक्टोबर दरम्यान भक्ती स्थळ (अहमदपूर) ते शक्ती स्थळ (मंगळवेढा ) ही यात्रा निघाली आहे. ही यात्रा सोलापुरात आली असताना आयोजित पत्रकार परिषदेत
एड. निळकंठ ताकबीडकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. या यात्रेचा उद्देश सांगितला.
महात्मा बसवेश्वर आणि शरणांच्या वास्तव्याने पावन झालेल्या मंगळवेढा येथे महात्मा बसवेश्वर यांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे, ही शाहू -फुले -आंबेडकर विचारांचा वारसा सांगणाऱ्या सर्वांची मागणी आहे मात्र गेल्या अनेक वर्षांपासून केवळ राजकीय लाभासाठी आश्वासन दिली जात आहेत असा आरोप करत विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी तसेच जनजागृती करण्यासाठी ही लिंगायत संघर्ष यात्रा काढण्यात आली आहे, असे ऍड. ताकबीडकर यांनी स्पष्ट केले.
लिंगायत समाजातील विद्यार्थ्यांसाठी बार्टी, सारथी, महाज्योतीप्रमाणे संस्था उभारून योजनांची अंमलबजावणी करावी. महात्मा बसवेश्वर महाराज यांचे वचन साहित्य मराठी भाषेत महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रकाशित व वितरित करण्यात यावे. लिंगायत समाजाच्या आरक्षणाचे शुद्धिपत्रक काढून उर्वरित समाज बांधवांना आरक्षणाच्या कक्षेत घेण्यात यावे. महाराष्ट्राच्या विधान भवन परिसरात महात्मा बसवेश्वर महाराज यांचा पुतळा उभारण्यात यावा. समाधी संस्कारासाठी प्रत्येक गावात स्मशानभूमी निर्माण करावी यासह अन्य मागण्यांकडे या यात्रेच्या माध्यमातून लक्ष वेधण्यात येत आहे, असेही ऍड.निळकंठ ताकबीडकर यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेस प्रा. उद्धव बांगर, वीरभद्र चिद्रे, विक्रम पटणे, धोंडीबा उपरे आदी उपस्थित होते.
मंगळवेढा कर्नाटकात असते तर भव्य स्मारक उभे राहिले असते
महात्मा बसवेश्वर महाराज यांचा समतेचा वैश्विक असा विचार आहे. जगभरात त्यांचे विचार सांगितले जातात. मंगळवेढा येथे महात्मा बसवेश्वर यांच्या कार्याचा इतिहास आहे. महाराष्ट्रात त्यांच्या स्मारकाची मागणी प्रलंबित आहे. मंगळवेढा जर कर्नाटकात असते तर सुमारे पाच हजार कोटींचे स्मारक उभारले असते, असेही ऍड.निळकंठ ताकबीडकर म्हणाले.
—-