_भविष्यातील विस्ताराच्या वेळी विचार करण्याचे सोलापुर विकास मंचाच्या विनंतीस आश्वासन_
सोलापुरात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) चे युनिट स्थापन करण्याच्या प्रस्तावास टाटा सन्सने सध्यातरी नकार दिला आहे. सोलापुर विकास मंचाचे संस्थापक सदस्य विजय कुंदन जाधव तथा रोहित मोरे यांनी ३ ऑक्टोबर २०२४ रोजी टाटा सन्सला पत्र लिहून सोलापुरात TCS युनिट स्थापन करण्याची विनंती केली होती. यावर टाटा सन्सकडून ८ ऑक्टोबर २०२४ रोजी उत्तर देण्यात आले.
या पत्रात, TCS चे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी आभार मानत सोलापुरातील प्रस्ताव सध्या मान्य करता येणार नसल्याचे स्पष्ट केले. कंपनीने अन्य ठिकाणी मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू केले असून, सध्या सोलापुरात नवीन युनिट स्थापन करणे शक्य नसल्याचे सांगितले आहे. मात्र, भविष्यातील वाढीच्या योजनांमध्ये सोलापुराचा विचार केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. *पत्र प्राप्त झाल्यानंतर मंचचे सदस्य विजय कुंदन जाधव यांनी टाटा सन्स च्या कार्यालयास फोन द्वारे सर्व हकिकत जाणुन घेतले असता तेथील उच्च पदस्थ अधिकार्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की सोलापूरातील उदासीन लोकप्रतिनिधी, मिरवणूक सांस्कृती, गुंडगिरी आणि जबरन हफ्तावसुली अश्या पद्धतीचे रिपोर्ट आमच्याकडे सोलापूर विषयी असल्याने सदस्या सोलापूरात गुंतवणूक करण्याचा कंपनीचा विचार नाही, भविष्यात परिस्तिथी सकारात्मक दिसल्यास कंपनी नक्कीच गुंतवणूकीचा विचार करेल असे त्यांनी कळविले.
सोलापुर विकास मंचाच्या प्रस्तावात शहराची वाढती औद्योगिक क्षमता आणि पायाभूत सुविधांचा उल्लेख करण्यात आला होता. सोलापुरातील प्रशिक्षित मनुष्यबळ, सुधारलेली पायाभूत सुविधा आणि शहराची रणनीतिक जागा ही TCS सारख्या तंत्रज्ञानावर आधारित कंपन्यांसाठी योग्य असल्याचे मंचाने नमूद केले होते. युनिट स्थापन झाल्यास शहरातील युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि सोलापुराच्या विकासाला चालना मिळेल, असा मंचाचा विश्वास होता. मात्र, टाटा सन्सकडून सध्याच्या प्रकल्पांमुळे हा प्रस्ताव स्वीकारता येणार नसल्याचे विनम्रता पुर्वक कळवण्यात आले. त्यांनी सोलापुर विकास मंचाच्या प्रयत्नांचे कौतुक केले असून भविष्यातील वाढीच्या योजना साकार करताना सोलापुरचा विचार केला जाईल असे आश्वासन दिले आहे.
या निर्णयामुळे सोलापुरातील विकासाच्या आकांक्षांना तात्पुरता झटका बसला असला, तरी शहरातील नेतृत्व अजूनही सकारात्मक आहे. सोलापुर विकास मंचाचे प्रयत्न सुरूच आहेत, आणि भविष्यातील गुंतवणूक व रोजगाराच्या संधींवर काम सुरूच राहणार आहे. सोलापुरातील होटगी रोड विमानतळ प्रकल्प आणि औद्योगिक विकासाचे पुढील काम, या शहराला भविष्यात TCS सारख्या कंपन्यांसाठी एक महत्त्वाचे केंद्र बनवू शकतात.