सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते नागनाथ भाऊ क्षीरसागर यांनी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार व संसद रत्न खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली आहे.
नागनाथ भाऊ क्षीरसागर यांनी अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून दोन निवडणुका तर मोहोळ विधानसभा मतदारसंघातून तीन निवडणुका लढलेल्या आहेत. त्यांचे सर्वपक्षीय नेतेमंडळीशी चांगला संपर्क व संबंध आहेत. मोहोळ विधानसभा मतदारसंघातून तालुक्यातील जनतेच्या आग्रहास्तव सोमेश क्षीरसागर यांना उमेदवारी मिळावी म्हणून शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमध्ये विधानसभा निवडणुकी संदर्भात सविस्तर व सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती ही त्यांनी दिली.
क्षीरसागर कुटुंबीय गेल्या ३० वर्षापासून मोहोळ तालुक्यामध्ये सामाजिक व राजकीय जीवनामध्ये कार्यरत आहेत. क्षीरसागर कुटुंबीयांचा अफाट जनसंपर्क, जनसामान्य मध्ये असणारी स्वच्छ प्रतिमा व मतदारसंघातील जनतेची मागणी या गोष्टीचा विचार करून सोमेश क्षीरसागर यांना उमेदवारी द्यावी अशी विनंती ही केली आहे.