दिवाळी निमित्त लागणाऱ्या सजावटीसाठी आकर्षक वस्तू बाजारात
सोलापूर – दिवाळीला आता अवघे काही दिवस उरले आहेत, त्यामुळे लोक दिवाळीच्या तयारीत पूर्ण उत्साहात व्यस्त आहेत. घराची स्वच्छता आणि सजावट करण्यात लोक कोणतीही कसर सोडू इच्छित नाहीत. असे मानले जाते की दिवाळीच्या रात्री देवी लक्ष्मी मुख्य दरवाजातून घरात प्रवेश करते. अशा स्थितीत घराचा दरवाजा स्वच्छ आणि सुशोभित असणं आवश्यक आहे. दिवाळीच्या रात्री देवी लक्ष्मी घरात प्रवेश करू इच्छित असल्यास, घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर काही शुभ मानल्या जाणाऱ्या गोष्टी नक्की असाव्या. दारावर रांगोळी, स्वस्तिक, पणती आणि त्यासोबत एक महत्वाची वस्तू म्हणजेच तोरण असावे. तोरण ही दिवाळीसारख्या सणाला लावणे अतिशय शुभ मानले जाते.
सोलापुरातील सात रस्ता परिसरात विविध प्रकारांचे तोरण कर्नाटकहून विक्री साठी आले आहेत. जवळपास १० प्रकारांचे तोरण बाजारात विक्रीस आल्याचे दिसत आहे.
व्यापारी, घरगुती लोक तोरण खरेदीसाठी गर्दी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. मोगरा, घंटी, दोरा, कापडी फुले, वेली, रंगबेरंगी फुल, फायबर प्लॅस्टिक अश्या विविध साहित्यांपासून तोरण बनवले जातात. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी ५ ते १० टक्के किंमतीत वाढ झाल्याची माहिती तोरण विक्रेत्याने दिली आहे.
कर्नाटकहून तोरणे घेऊन आलेल्या १० कुटुंबीयांना सोलापुरात रोजगार उपलब्ध झाला आहे. १२ फुटी तोरणाला १ हजार तर ६ फुटी तोरणासाठी आठशे आणि त्याहून कमी साइज़ म्हणजे ३ फुटी तोरणासाठी सरासरी पाचशे रुपये आकारले जात आहेत. तरी तोरण खरीदीसाठी सोलापूरकरांची गर्दी पहायला मिळत आहे.
चौकट –
नैसर्गिक नारळांची जागा घेतली प्लास्टिकच्या नारळाने –
विविध धार्मिक कार्यांसाठी नारळांचा वापर केला जायचा. नारळ हे फळ धार्मिक कार्यांसाठी शुभ मानले जायचे. महिलांची ओटी भरण्यापासून ते दरवाजाच्या तोरणापर्यंत नारळ वापरात असायचे. आता मात्र दरवाज्याच्या तोरणातून नैसर्गिक नारळ गायब होऊन त्यांची जागा प्लास्टिक तोरण रूपी नारळाने घेतलेले बघायला मिळत आहे.
कोट –
गेल्या १० वर्षांपासून दिवाळी या सणानिमित्त जर वर्षी सोलापूरला येत असतो. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी किंमतीत १० टक्क्याने वाढ झाली आहे. तोरण बनवण्यासाठी गेल्या ३ महिन्यांपासून आम्ही तयारी करत असतो. संपूर्ण परिवार तोरण बनविण्यासाठी, विक्रीसाठी परिश्रम करत असते. आम्ही जेवढे तोरण, साहित्य बनवतो त्यातील एकही शिल्लक राहत नाही. आतापासूनच तोरण, हार खरेदीसाठी दुकानदारांची आणि घरगुती नागरिकांची गर्दी होत आहे.
– अभिषेक रेड्डी, विक्रेता
कोट –
दिवाळी सणामध्ये सर्व महिला घर साफ करत असतात. सणानिमित्त खरेदी सुरु होते. रांगोळी, पणत्या, तोरण, फराळाचे साहित्य अश्या गोष्टींची खरेदी करायला आम्ही महिला सुरुवात करतो. दार चांगले दिसावे यासाठी दाराला तोरण, दारापुढे रांगोळ्या, पणत्या अश्या प्रकारची तयारी करत असतात. ह्याने घरात लक्ष्मी येत असते आणि सर्व घरासाठी शुभ असते.
– अश्विनी मोरे, ग्राहक