सोलापूर : प्रतिनिधी
शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून हिंदू महासभेकडून संजय साळुंखे यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधातील उमेदवारांमध्ये संजय साळुंखे यांच्या अर्जामुळे आणखी एकाची भर पडली आहे.
आमदार विजयकुमार देशमुख यांच्या कारभारावर जनता नाराज असून भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांनी आमदार देशमुख यांना पुन्हा उमेदवारी देऊ नये अशी मागणी भाजपाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला करणाऱ्यांमध्ये संजय साळुंखे यांचे नाव आघाडीवर होते. शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात आमदार विजयकुमार देशमुख यांच्यावर नाराज असणाऱ्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची जुळवाजुळव गेल्या अनेक महिन्यांपासून संजय साळुंखे हे करीत होते. सलग ४ वेळा आमदार विजयकुमार देशमुख यांना उमेदवारी दिल्यामुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी असल्याची भूमिका घेऊन संजय साळुंखे यांच्यासह देशमुख विरोधी गटाने शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात राळ उडवून दिली होती.
शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात राहिलेली विकासकामे, तरुणांना अपेक्षित रोजगार, कामगारांचे प्रश्न, हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर होणारा अन्याय आदी मुद्दे घेऊन आपण ही निवडणूक लढवीत असल्याचे शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे हिंदू महासभेचे उमेदवार संजय साळुंखे यांनी सांगितले.
संजय साळुंखे यांनी गेल्या काही वर्षांपासून श्रीराम जन्मोत्सव समितीच्या माध्यमातून सामाजिक, धार्मिक काम केले आहे. या संपर्काचा फायदा या विधानसभा निवडणुकीमध्ये होणार असल्याचा दावा उमेदवार संजय साळुंखे यांनी उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतर केला. सर्वसामान्य नागरिकांच्या, कार्यकर्त्यांच्या थेट संपर्कात असणे, सामाजिक कार्यात अग्रेसर राहणे या मुद्द्यांवर मी निवडणुकीला सामोरे जात आहे. भाजपाच्या काही नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा उघड तर काही नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा मला छुपा पाठिंबा आहे. त्यामुळे या निवडणुकीत माझा विजय निश्चित आहे, असे हिंदू महासभेचे उमेदवार संजय साळुंखे यांनी सांगितले. संजय साळुंखे यांच्या उमेदवारीमुळे शहर उत्तर मधील हिंदुत्ववादी मतदानात मोठे विभाजन होणे अटळ आहे.
याप्रसंगी वेदमूर्ती पंडित वेणुगोपाल जिल्ला, अमरनाथ बिराजदार, विश्वनाथ दुर्लेकर, रमेश पांढरे, अबु चौगुले, अर्जुन मोहिते, राजू निंबाळकर, अनिल चौगुले, काशिनाथ आनंदकर आदी उपस्थित होते.