man marathi news network,
राहुल गांधी यांच्यावर गुन्हा नोंद करून त्यांची खासदारकी रहित करा !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर
सोलापूर – संसदेतील विरोधीपक्षनेता आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी हिंदूंना हिंसक, खोटारडे आणि द्वेषपूर्ण असे संबोधल्याने हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. तरी राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व तात्काळ रहित करून त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी स्वीकारले. या प्रसंगी भाजपचे माजी नगरसेवक चंद्रकांत रमणशेट्टी, हिंदुत्वनिष्ठ श्री. किशोर पुकाळे, श्री. राजेंद्र पलनाटी, श्री. लक्ष्मीनारायण बामनला, कर सल्लागार श्री. गणेश वास्ते, हिंदु जनजागृती समितीचे श्री. दत्तात्रय पिसे आदी उपस्थित होते.
राष्ट्रपतींच्या नावे असलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राहुल गांधी यांनी हिंदू समाजाची सार्वजनिक आणि बिनशर्त क्षमायाचना करावी. राहुल गांधी यांनी वा त्याच्या काँग्रेस पक्षाने पहिल्यांदा असे वक्तव्य केले आहे असे नाही. तर यापूर्वी काँग्रेसने भगवा दहशतवाद किंवा हिंदू दहशतवाद संकल्पना मांडण्याचा प्रयत्न केला आहे. वर्ष १९९० च्या दशकात काश्मीरी हिंदूंना काश्मीरमधून कोणी विस्थापित केले ? कोणत्या समाजाने हे विस्थापन केले हे राहुल गांधी सांगतील का ? ‘सर तन से जुदा’चा फतवा काढून देशभर अनेक हिंदूंचे गळे कापणारे कोण होते, हे राहूल गांधी सांगतील का ? संपूर्ण विश्व जिहादी आतंकवादाने त्रस्त आहे, लाखो लोक मारले गेले आहे, पण या दहशतवादाचा रंग कोणता ? हे राहूल गांधी कधी सांगितलेले नाही. सर्वांत प्राचीन असलेला हिंदु धर्म हा सहिष्णु असल्यामुळे त्याने अन्य पंथीयांप्रमाणे कधी साम्राज्य विस्तारासाठी अथवा धर्मपरिवर्तनासाठी इतरांवर आक्रमण केले नाही.
हिंदु धर्म हा वसुधैव कुटुंबकम किंवा संपूर्ण जग एक कुटुंब या तत्त्वाचे प्रतिनिधित्व करतो. या समाजाला हिंसक, खोटारडा, द्वेष्टा किंवा दहशतवादी म्हणून लेबल लावणे ही त्याची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न आहे. लोकसभेत ‘लोकसभा सदस्यत्वा’ची शपथ घेतांना सर्वांशी समभावाने वागण्याची जी शपथ घेतली जाते. त्या शपथेचा राहूल गांधी यांनी उडपपणे भंग केला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांचे लोकसभेचे सदस्यत्व तात्काळ रद्द करण्यात यावे आणि समाजात भेद, द्वेष निर्माण करणार्यांना अशा लोकांना निवडणूक लढवण्यासाठी कायमस्वरूपी बंदी घातली पाहिजे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.