सोलापूर प्रतिनिधी –
दहा वर्षापासून दोंदे नगरच्या रस्त्याची दुरावस्था
आमदार आणि नगरसेवकांचेही दुर्लक्ष
महापालिकेचे सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित यांना निवेदन
सोलापूर, दि. १०-
जुळे सोलापूर येथील सर्वात जुनी आचार्य दादासाहेब दोंदे प्राथमिक शिक्षकांची गृहनिर्माण संस्थेच्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे.
दहा वर्षांपूर्वी आमदार दिलीप माने यांच्या निधीतून झालेल्या हा रस्ता एवढा खराब झाला आहे की दुचाकीवरून जाणाऱ्या नागरिकांचे कंबरडे मोडण्याची वेळ आली. आजूबाजूच्या सोसायटीचे रस्ते झाले. परंतु दोंदे नगरकडे साफ दुर्लक्ष झाले आहे. याबाबत या भागाचे आमदार सुभाष देशमुख यांना एक डिसेंबर २०२३ रोजी निवेदन दिले होते. परंतु आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नाही. नगरसेवक संगीता जाधव, राजेश काळे,अश्विनी चव्हाण व राजश्री बिराजदार पाटील तर दोंदे नगरकडे फिरकायलाच तयार नाहीत. जर रस्ता झाला नाही तर या दोंदेनगरच्या सर्व नागरिकांनी येत्या विधानसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
शंभर टक्के कर भरणारे दोंदे नगरच्या या समस्याबाबत महापालिकेचे सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित यांना मंगळवारी समस्या सोडवण्याचे निवेदन देण्यात आले. रस्त्यांबरोबरच दैनंदिन साप्ताहिक स्वच्छता करण्यासाठी महापालिकेचे कामगार पाठवा, दोंदे नगरला योग्य दाबाने पाणीपुरवठा करा, नरसिंहनगर जवळ झाडे तोडलेला कचरा त्वरित उचला, नरसिंह नगर येथे फ्लॅटचे बांधकाम चालू असल्यामुळे पाण्याची फुटलेली पाईपलाईन दुरुस्त करा आदी मागण्यांचा या निवेदनात समावेश आहे