‘पूर्वपुण्य असता गाठी संतभेटी होय…..’
हजारो विठ्ठल भक्तांनी अनुभवला संत भेटीचा सोहळा : श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात लोटली भाविकांची गर्दी
सोलापूर : प्रतिनिधी
पूर्वपुण्य असता गाठी संतभेटी होय l
धन्य धन्य संतसंग फिटे तग जन्माचा ll
हा श्री संत एकनाथ महाराजांचा अभंगच जणू हजारो सोलापूरकर विठ्ठल भक्तांनी बुधवारी अनुभवला. निमित्त होते सद्गुरु श्री प्रभाकर स्वामी महाराज मंदिरातील संत श्री गजानन महाराज आणि सद्गुरु श्री प्रभाकर स्वामी महाराज पालखी संत भेट सोहळ्याचे.
आषाढी यात्रेच्या निमित्ताने शेगावहून पंढरपूरला निघालेल्या संत श्री गजानन महाराजांची पालखी सोलापूर शहरात प्रवेश केल्यानंतर परंपरेप्रमाणे सम्राट चौक येथील सद्गुरु श्री प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात आली. येथे दोन्ही संतांच्या पालख्यांची भेट झाली. यावेळी भाविकांनी ‘संत श्री गजानन महाराज की जय’, ‘सद्गुरु श्री प्रभाकर स्वामी महाराज की जय’ चा एकच जयघोष सुरू केला. भाविकांनी हा हृद्य सोहळा याची देही याची डोळा अनुभवला.
मुख्य रस्त्यापासून सद्गुरु श्री प्रभाकर महाराज मंदिरापर्यंत रांगोळीच्या आणि फुलांच्या पायघड्या अंथरण्यात आल्या होत्या. पालखीच्या दोन्ही बाजूंनी भाविकांकडून पुष्पवृष्टी केली जात होती. पालखी भेट सोहळ्यानंतर भाविकांच्या उपस्थितीत भक्तीमय वातावरणात सामूहिक आरती करण्यात आली.
यानंतर सुमारे पालखी सोबत असलेले वारकरी आणि ५ हजार भाविकांना पिठलं, भाकरी, भात, आमटीचा महाप्रसाद देण्यात आला. यावेळी सोलापूर शहर जिल्ह्यातील हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
यावेळी सद्गुरु श्री प्रभाकर स्वामी महाराज मंदिर ट्रस्टचे चीफ ट्रस्टी दत्तात्रय देशमुख, मॅनेजिंग ट्रस्टी बाळकृष्ण शिंगाडे, ट्रस्टी उदय वैद्य, रामभाऊ कटकधोंड, वसंत बंडगर, वामन वाघचौरे, ट्रस्टी सदस्य सुभाष बद्दूरकर, मोहन बोड्डू, सम्राट राऊत, रवी गुंड, रमेश देशमुख, व्यवस्थापक निरंजन दंतकाळे आदी उपस्थित होते.