अमित शाहांच्या खात्याचं राज्यमंत्रीपद मुरलीधर मोहोळांकडे, रक्षा खडासेंकडे क्रीडा खातं, महाराष्ट्रातील मंत्र्याकडे कोणकोणती खाती?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि.10) पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर आज खातेवाटपाला सुरुवात झाली आहे. एनडीएच्या सरकारमध्ये 72 जणांनी शपथ घेतली होती. त्यानुसार नितीन गडकरी, अमित शाह, एस जयशंकर आणि राजनाथ सिंह यांचे खाते कायम ठेवण्यात आले आहे. नितीन गडकरी यांना पुन्हा त्यांचं रस्ते आणि परिवहन वाहतूक मंत्रालय, अमित शाह यांना गृह, एस जयशंकर यांना परराष्ट्र, राजनाथ सिंह यांना संरक्षण आणि अश्विनी वैष्णव यांना रेल्वेमंत्रालय मिळालं आहे.
महाराष्ट्रातील मंत्र्यांना कोणती खाती?
नितीन गडकरी – रस्ते आणि परिवहन वाहतूक मंत्रालय
पियुष गोयल – वाणिज्य मंत्रालय
रक्षा खडसे – क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री
मुरलीधर मोहोळ – सहकार आणि नागरी उड्डाण राज्यमंत्री
रामदास आठवले – सामाजिक न्याय राज्यमंत्री
प्रतापराव जाधव – आयुष आणि आरोग्य राज्यमंत्री
महाराष्ट्रातून नितीन गडकरी आणि पियुष गोयल यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले होते. दोघांनीही आज मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. नितीन गडकरी यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची हॅटट्रिक केली आहे. गडकरी यावेळी नागपूर लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. तर पियुष गोयल उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. महाराष्ट्रात सर्वात जास्त मताधिक्य पियुष गोयल यांना मिळाले होते. दरम्यान, आता त्यांनी पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्रिपद खेचून आणले आहे.