man marathi news,
सोलापूर प्रतिनिधी –
राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीला मराठवाड्यात प्रचंड प्रतिसाद मिळत असून मराठवाड्यापाठोपाठ पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याची सुरवात सोलापुरातून होणार आहे. जुलैअखेरची कोणतीही तारीख निश्चित होऊ शकते, असे आयोजकांतर्फे सांगण्यात आले.
सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी प्रशालेत या रॅलीच्या नियोजनाची बैठक झाली. या बैठकीत रॅली व सभेबाबत नियोजन करण्यात आले. धाराशिव येथील यापूर्वीच्या बैठकीत बोलताना सोलापूरच्या रॅलीसाठी मनोज जरांगे यांनी प्राधान्य दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अश्वारूढ पुतळ्यासमोर मंच तयार करून छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापर्यंत ध्वनिक्षेपकाची व श्रोत्यांना बसण्याची व्यवस्था तयार करण्यात येणार आहे. ही रॅली व सभा यापूर्वीच्या २०१६ च्या मोर्चापेक्षा मोठी करण्याचे नियोजन करण्यात येत आले आहे. बैठकीला राजन जाधव, पुरुषोत्तम बरडे, प्रशांत पाटील, प्रा. गणेश देशमुख, श्रीरंग लाळे, माऊली पवार, डॉ. प्रमोद पाटील, बालाजी सिरसट, गोविंद पाटील, विश्वास डोंगरे आदी उपस्थित होते.