मराठा आंदोलकांनी शरद पवारांची गाडी अडवून विचारला जाब, भूमिका स्पष्ट करा म्हणत दिल्या घोषणा
सोलापूर : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे रविवारी पक्षाच्या मेळाव्यासाठी बार्शीकडे जात असताना वाटेत कुर्डूवाडीजवळ मराठा आरक्षण आंदोलकांनी त्यांची मोटार अडवून मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर त्यांना भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. पवार यांनी मराठा आरक्षण आंदोलकांशी संवाद साधला. मात्र त्यातून समाधान झाले नाही.
कुर्डूवाडीमार्गे बार्शीकडे जाताना वाटेत मराठा आरक्षण आंदोलकांनी त्यांची मोटार अडविली आणि मराठा आरक्षणाबद्दल भूमिका विचारली. त्यावेळी पवार यांनी मोटारीच्या दरवाजाची काच खाली करून आंदोलकांच्या भावना समजून घेतल्या. मराठा आरक्षणाला आपला पूर्वीपासूनच पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परंतु समाधान न झालेल्या मराठा आंदोलकांनी, तुम्ही मराठा आरक्षणाला फक्त पाठिंबा देता, त्यावर प्रत्यक्ष सक्रिय भूमिका का घेत नाही, असा सवाल केला. यावेळी मराठा आंदोलकांनी मराठा आरक्षणाच्या घोषणा दिल्या.