सोलापूर प्रतिनिधी –
गुंठेवारी खरेदी-विक्री प्रक्रिया तसेच बांधकाम परवाने बंद असल्यामुळे लाखो मिळ्कतधारक मागील अनेक वर्षांपासून त्रस्त आहेत. लाखो लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असूनही सरकार तसेच लोकप्रतिनिधी हा विषय सोडवणूक करण्यासाठी उदासीन दिसत आहेत. सरकारच्या या उदासीन धोरणामुळे मिळ्कतधारक हवालदिल झाले आहेत. संभाजी आरमारने हा विषय मार्गी लागावा म्हणून अनेक वेळा आंदोलन केले. निवडणूकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी हा विषय निकाली निघणे गरजेचे आहे. सरकारला या प्रश्नी जाग आणण्यासाठी संभाजी आरमारने बुधवार दि. 14 ऑगस्ट 2024 रोजी धडक मोर्चाचे आयोजन केले आहे. चार हुतात्मा चौकातून सकाळी 11 वाजता या मोर्चाचा शुभारंभ होणार आहे. चार हुतात्मा चौक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक – सिद्धेश्वर मंदिर मार्गे पूनम गेट असा मोर्चाचा मार्ग असणार आहे. आपल्या न्याय-हक्काची मागणी सरकारकडून पुर्ण करुन घेण्यासाठी गुंठेवारी प्रश्नाने पिडीत असणारया प्रत्येकानी या मोर्चात मोठ्या संख्येने सामील व्हावे असे आवाहन संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी केले आहे.