प्रतिनिधी –
सतरा वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘साडे माडे तीन’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाच्या निमित्ताने महाराष्ट्राचा सुपरस्टार अंकुश चौधरी याने दिग्दर्शनात पदार्पण केले होते. चित्रपटाची कथा, दिग्दर्शन, कलाकार या सगळ्याच जमेच्या बाजू होत्या. त्यामुळेच प्रेक्षकांनी या चित्रपटावर भरभरून प्रेम केले. चित्रपटातील अशोक सराफ, भरत जाधव आणि मकरंद अनासपुरे ही कुरळे ब्रदर्सची तिकडी सगळयांनाच भावली. या तिकडीची धमाल प्रेक्षकांना आता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर अनुभवयाला मिळणार असून लवकरच दिग्दर्शक अंकुश चौधरी ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या चित्रपटाची सोशल मीडियावरून घोषणा करण्यात आली आहे. ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ मध्ये अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव हे ‘साडे माडे तीन’मधील कलाकारच प्रमुख भूमिकेत दिसणार असून आणखी या चित्रपटात कोणते कलाकार झळकणार, हे मात्र अद्यापही गुपित आहे. अमेय विनोद खोपकर पिक्चर्सच्या स्वाती खोपकर, निनाद बत्तीन यांच्यासह ‘उदाहरणार्थ’चे सुधीर कोलते यांची निर्मिती असणाऱ्या या चित्रपटाचे छायाचित्रण संजय जाधव करणार आहेत. येत्या सप्टेंबरपासून ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’च्या चित्रीकरणाचा शुभारंभ होणार आहे.
चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अंकुश चौधरी म्हणतो, ” पुन्हा एकदा साडे माडे तीनची घोषणा करताना अत्यंत आनंद होतोय. एखाद्या चित्रपटाचा दुसरा भाग येणे, हे खरंच खूपच जबाबदारीचे काम असते. प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढतात. मला खात्री आहे, ‘साडे माडे तीन’वर जसे प्रेक्षकांनी प्रेम केले, तसेच या चित्रपटावरही करतील. या भागात कुरळे ब्रदर्सची धमाल डबल झाली आहे. यात आता ते काय करणार हे प्रेक्षकांना लवकरच कळेल. या चित्रपटाच्या निमित्ताने मी प्रथमच एव्हीके पिक्चर्स आणि उदाहरणार्थसोबत काम करत असून या पूर्वी एव्हीके पिक्चर्सने अनेक सुपरहिट चित्रपट मराठी सिनेसृष्टीला दिले आहेत. त्यामुळे यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव निश्चितच कमाल असेल. अमेय खोपकर, स्वाती खोपकर, निनाद बत्तीन, सुधीर कोलते यांची साथ लाभल्याने हा चित्रपट निश्चितच एका वेगळया उंचीवर जाईल, यात शंका नाही. या टीमने मराठी सिनेसृष्टीला एक वेगळेच स्थान मिळवून दिले आहे.”