सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सोलापूर कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आज एकत्र येवून जनशक्ती संघटनेचे संस्थापक अतुल खुपसे पाटील यांचा निषेध केला.
सोलापूर प्रतिनिधी –
काही दिवसापूर्वी अतुल खुपसे यांच्या नेतृत्वात सार्व. बांधकामचे अधिक्षक अभियंता संजय माळी यांच्या विरोधात आंदोलन झाले आहे. माढा तालुक्यातील रस्त्यांच्या कामं निकृष्ट दर्जाची झाली असून यास अधिक्षक अभियंता माळी यांच्यासह इतर सहकारी जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला.
तसेच त्यांच्यावर कारवाईसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळ्या पट्ट्या लावून रक्तदान करून आंदोलन करण्यात आलं. माळी यांची चौकशी करावी अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.
कोणतेही पुरावे नसताना प्रशासनाचं मनोधैर्य खच्चीकरण करण्यासाठी अशी आंदोलनं होत असून अधिकाऱ्यांची वैयक्तिक स्वरूपात बदनामी करण्यात येत आहे. यासाठी सर्व कर्मचारी आज संजय माळी यांच्यासह बांधकाम कार्यालयासमोर जमले. याठिकाणी घोषणाबाजी झाली. यावेळी सर्व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून दबाव आणणाऱ्या प्रवृत्तीवर सरकारनं कारवाई करावी. कर्मचाऱ्यांना संरक्षण द्यावं अशी मागणी केली.