सोलापूर –
बिग बटरफ्लाय मंथनिमित्त वाईल्डलाईफ काँझर्वेशन असोसिएशन, सोलापूर तर्फे आज रविवार दि. 22 सप्टें. 2024 सकाळी 8 ते 10 या वेळेत “बटरफ्लाय वॉक” हा एक आगळावेगळा उपक्रम श्री सिद्धेश्वर वनविहार, सोलापूर येथे संपन्न झाला. या उपक्रमाचे हे तिसरे यशस्वी वर्ष आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवानंद हिरेमठ यांनी उपस्थित WCAS सदस्यांची ओळख तसेच आजच्या उपक्रमाबद्दल माहिती दिली. यानंतर उपस्थित वन्यजीवप्रेमींचे दोन गटांमध्ये विभाजन करण्यात आले. अजित चौहान, सचिन पाटील यांनी प्रत्येकी एका ग्रुपचे प्रतिनिधित्व केले. प्रातःकाळ असल्याने पर्यावरणप्रेमींना अनेक फुलपाखरांचे दर्शन झाले. चिमुकल्यांनी तर अक्षरशः हा परिसरच डोक्यावर घेतला होता. इतकी सारी फुलपाखरे एकाच ठिकाणी, एकत्र पाहिल्यानंतर त्यांच्या उत्साहाला पारावर राहिला नव्हता. यावेळी अनेकांनी फुलपाखरांची नावे व संख्या नोंद करून घेतली. यात व्हाईट ऑरेंज टीप, यल्लो ऑरेंज टीप, कॉमन गल, कॉमन रोझ, क्रीम्सन रोझ कॉमन मॉर्मोन, ग्रेट एगफ्लाय, कॉमन थ्री रिंग, कॉमन एमिग्रँट कॉमन इव्हनिंग ब्राउन, कॉमन ग्रास यल्लो, कॉमन कास्टर, कॉमन पेरिओट, कॉमन सिल्व्हरलाईन, सायके, लेझर डार्ट, लेमन पॅन्सी, पायोनिअर इ. 20 एक प्रकारच्या फुलपाखरांची नोंद करण्यात आली. यावेळी फुलपाखरू अभ्यासक अजित चौहान व सचिन पाटील यांनी फुलपाखरांच्या विविध जाती, फुलपाखरांचे खाद्य, फुलपाखराचे पर्यावरणीय महत्त्व, फुलपाखरांचा जीवनक्रम इत्यादी अनेक विविध पैलूंवर आपल्या अनुभवांद्वारे प्रकाश टाकला. तासाभराच्या फुलपाखरू निरीक्षणानंतर सर्व पर्यावरणप्रेमी येथील मियावॉकी फॉरेस्ट (सघन वन) याठिकाणी एकत्र आले. याठिकाणी वनविभागाचे श्रीहरी पाटील यांनी सघन वनाबद्दलची माहिती दिली.
या कार्यक्रमास WCAS चे संतोष धाकपाडे, सुरेश क्षिरसागर, दिपक करकी, अजय हिरेमठ, पर्यावरणप्रेमी अजित कोठारी, प्रणोती कोठारी, विद्या भगरे-भोसले तसेच दिव्य मराठीचे पत्रकार विनोद कामतकर इ. उपस्थित होते. या उपक्रमास वनविभागाचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, सहा. वनसंरक्षक अजित शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी दिपक खलाने यांचे सहकार्य लाभले.