सोलापूर विद्यापीठात ‘फॅकल्टी डेव्हलपमेंटच्या’ पाच दिवसीय कार्यशाळेस प्रारंभ
सोलापूर, दि. 23- आज जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात कौशल्य असलेल्या मनुष्यबळाची मागणी वाढत आहे. विकसित देशांमध्येही लहान-लहान कौशल्य आधारित कामे करण्यासाठी कुशल मनुष्यबळाचा तुटवडा पडत आहे. त्यासाठी कौशल्य आधारित मनुष्यबळ निर्माण करण्याबरोबरच अध्यापकांनी कौशल्य आधारित संशोधनावर भर द्यावा, असे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांनी केले.
महाराष्ट्र राज्य फॅकल्टी डेव्हलपमेंट अकॅडमी आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कौशल्य विकास केंद्राच्यावतीने आयोजित ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम’च्या उद्घाटनप्रसंगी कुलगुरू प्रा. महानवर हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अकॅडमीचे समन्वयक डॉ. सुरज बाबर, संगणक शास्त्र विभागाचे डॉ. श्रीराम राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविकात कौशल्य विकास केंद्राचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी या कार्यशाळेसाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून शंभरहून अधिक लोकांनी नोंदणी केली होती. त्यापैकी केवळ 45 प्राध्यापकांची निवड या कौशल्य आधारित प्रशिक्षणासाठी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. हे प्रशिक्षण निवासी पाच दिवस चालणार आहे. यामध्ये एकत्रित कौशल्य आधारित अभ्यासक्रमावर प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना कुलगुरू प्रा. महानवर म्हणाले, भारतात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवण्यास सुरुवात झाली आहे. या शैक्षणिक धोरणानुसार प्रत्येक अभ्यासक्रम हा कौशल्य आधारित असणार आहे. ज्यामुळे भारतात ‘मेक इन इंडिया’ ही संकल्पना विकसित झाली पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याला कौशल्य आधारित शिक्षण मिळाल्यानंतर छोटा-मोठा उद्योग व्यवसाय उभारण्याची संधी उपलब्ध होणार आहे. सध्या मोठ-मोठ्या तंत्रज्ञानाबरोबरच दैनंदिन गरजा पूर्ण करणारे कौशल्य देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. जपान सारख्या देशांमधून पाच लाख कौशल्य आधारित नागरिकांची मागणी केली जात आहे. नवीन तंत्रज्ञानाचा अंगीकार शिक्षकांनी केला पाहिजे. शिक्षकांनी नव-नवीन कौशल्य आत्मसात करून कौशल्याभिमुख विद्यार्थी घडवला पाहिजे, तेव्हाच देशाची प्रगती होते, असेही त्यांनी सांगितले.
फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामसाठी महाराष्ट्रातून मुंबई, ठाणे, नगर, पुणे, संभाजी नगर, लातूर, अमरावती आदी विविध जिल्ह्यातून प्राध्यापक सहभागी झाले आहेत. यावेळी ऋतुजा तांबे, डॉ. अभिजीत जगताप, प्रा. डॉ. गौतम कांबळे, सहायक कुलसचिव सोमनाथ सोनकांबळे, जनसंपर्क अधिकारी राहुल वंजारे यांच्यासह प्राध्यापक, कौशल्य विकास केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रुती देवळे यांनी केले. तर आभार डॉ. श्रीराम राऊत यांनी मानले.
सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात आयोजित ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम’च्या उद्घाटनप्रसंगी कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर, महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अकॅडमीचे समन्वयक डॉ. सुरज बाबर, डॉ. प्रभाकर कोळेकर, डॉ. श्रीराम राऊत व अन्य.