सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूरकरांना आता लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागली आहे. गेल्या १० वर्षांपासून शिस्तबद्ध आणि वैविध्यपूर्ण वादनाने रसिकांची मने जिंकणाऱ्या विश्वविनायक प्रतिष्ठान संचलित विश्वविनायक वाद्यवृंदाची निवड चाचणी रविवार, २३ जून रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत हरीभाई देवकरण प्रशाला येथील शि. प्र. मंडळी इंग्लिश मिडियम स्कूल येथे होणार आहे, अशी माहिती विश्वविनायक प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि ख्यातनाम तालवादक नागेश भोसेकर यांनी दिली.
सुमारे ४०० सदस्य संख्या असलेल्या या वाद्यवृंदात विविध शाखांचे महाविद्यालयीन विद्यार्थी, शालेय विद्यार्थी, डॉक्टर, वकील, अभियंते अशी मंडळी सहभागी होतात. शिस्तबद्ध वादनासाठी विश्वविनायक वाद्यवृंद ओळखला जातो. विश्वविनायक प्रतिष्ठानतर्फे विविध उत्सवात वादनासोबतच वेगवेगळ्या सामाजिक उपयोगी उपक्रमातही सदस्यांचा सहभाग असतो. दशकपूर्तीनिमित्त यंदाच्यावर्षीही विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. सोलापूर परिसरातील ढोल – ताशाप्रेमींनी या निवड चाचणीस उपस्थित रहावे, असे आवाहन विश्वविनायक प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.