नवरात्र घटस्थापना वेळ २०२४ Video
सोलापूर – आश्विन शु. प्रतिपदेच्या दिवशी म्हणजे 3 ऑक्टोंबर 2024 रोजी गुरुवारी, घटस्थापना होणार असून या दिवशी ब्रह्म मुहूर्तापासून म्हणजे सुमारे पहाटे ५ पासून दुपारी १.४५ पर्यंत कोणत्याही वेळी घटस्थापना करून नवरात्रातील पूजन करता येईल. या वर्षी आश्विन शुक्ल तृतीया तिथीची वृद्धी झाल्याने नवरात्र दहा दिवसांचे आहे.
दि. 7 ऑक्टोंबर रोजी ललिता पंचमी असून दि. 10 ऑक्टोबर रोजी महालक्ष्मी पूजन आहे. दि. 11 रोजी महाष्टमीचा व नवमी उपवास एकाच दिवशी असून दि. 12 ऑक्टोबर रोजी शनिवारी नवरात्रोत्थापन आणि दसरा आहे.
काही अडचणींमुळे ज्यांना 3 ऑक्टोबर रोजी घटस्थापना करणे शक्य होणार नाही त्यांनी अशौच निवृत्ति नंतर पाच, आठ, दहा किंवा अकरा ऑक्टोबर यापैकी कोणत्याही दिवशी घटस्थापना करावी. व 12 ऑक्टोबर रोजी नवरात्रोत्थापन करावे. महालक्ष्मी पूजन ह्या दिवशी मध्यरात्री अष्टमी तिथीवर देवीचे पूजन करण्याची प्रथा आहे. अशी अष्टमी 10 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री मिळते त्यामुळे त्या दिवशी महालक्ष्मीपूजन दिलेले आहे. मात्र दुर्गाष्टमी 11 ऑक्टोबर रोजी आहे.
विजया दशमी, दसरा, सीमोल्लंघन हे 12 ऑक्टोबर रोजी असून साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी विजय मुहूर्तावर अनेक लोक आपल्या नवीन उपक्रमाचा आरंभ करतात. हा विजय मुहूर्त महाराष्ट्रामध्ये दुपारी २.२२ ते ३.०९ या दरम्यान आहे. अशी माहिती मोहन दाते, पंचांगकर्ते यांनी दिली आहे.
चौकट – वयोमानामुळे किंवा आरोग्य विषयक अडचणींमुळे ज्यांना नवरात्रीचे 9 दिवस उपवास करणे शक्य नाही, त्यांनी उठता बसता म्हणजे नवरात्रीच्या पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपवास करावा. मात्र ते ही शक्य नसल्यास किमान अष्टमीचा उपवास तरी करावा.
मोहन दाते, पंचांगकर्ते