२० तारखेला मुस्लिम समाजाचा मेळावा ; ठरणार अंतिम निर्णय
सोलापूर – महाविकास आघाडीने मुस्लिम उमेदवार द्यावा. जर दिला नाही तर मुस्लिम समाज २० तारखेला भव्य मेळावा घेऊन आपली भूमिका स्पष्ट करेल. अन्यथा बंडखोरी करू असा इशारा ही मुस्लिम समाजाच्या वतीने देण्यात आला.
सोलापूर शहर मध्य मतदारसंघात मुस्लिम समाजाला उमेदवारी द्यावी यासाठी विधानसभा अस्तित्वात आल्यापासून काँग्रेस पक्षाकडे समाजाने व काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मागणी करत आलेले आहेत. पण एकदाही मुस्लिम समाजाच्या उमेदवारास या मतदारसंघांमध्ये निवडणुकीत संधी देण्यात आलेली नाही. २००९, २०१४, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कांग्रेसच्या विद्यमान खा. प्रणितीताई शिंदे यांनी विजय प्राप्त केलेला आहे. कृतिशील नेतृत्व असलेल्या प्रणितीताई शिंदे यांच्यामुळे तीन निवडणुकीत मतदारसंघावर आपला दावा न सांगता कॉग्रेसचे मुस्लिम कार्यकर्ते व मतदार प्रणितीताईं सोबत राहिलेले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून मुस्लिम समाजाने कॉग्रेसला भरघोस मते दिलेली आहेत. बुथनिहाय मतदाराचे अवलोकन केले असता त्याची प्रचिती येईल. पहिल्या विधानसभा निवडणुकीपासून आजपर्यंत दोन-तीन अपवाद वगळता सदर मतदारसंघात काँग्रेसने यश मिळवले आहे. गेल्या दोन निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. आडम मास्तर यांची डिपॉझिट सुद्धा शाबित राहिलेली नाही. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत सदर मतदारसंघ महाविकास आघाडीच्या नावावर इतर पक्षाला देऊ नये अशी सर्वाची मागणी आहे.
वास्तविक पाहता या मतदारसंघांमध्ये मुस्लिम समाज संख्येने इतर समाजापेक्षा जास्त आहे. त्यानंतर पद्मशाली, मोची व भटक्या-विमुक्त जमातीचे प्राबल्य आहे. म्हणून महाविकास आघाडीने मुस्लिम उमेदवार देण्याची आग्रही भूमिका घेतली आहे.
या पत्रकार परिषदेस मुस्लिम समाजातील नेते माजी महापौर आरिफ शेख , नगरसेवक तौफिक शेख ,नगरसेवक उद्योजक शकील मौलवी, नगरसेवक शौकत पठाण, कोमारू सय्यद आदिसह समाज बांधव उपस्थित होते.
चौकट – महाविकास आघाडीने मुस्लिम समाज उमेदवारी द्यावी अन्यथा याबाबत 20 ऑक्टोबर ला फॉरेस्ट येथील ताज कंपाउंड येथे सायंकाळी ७ वाजता घेण्यात येणाऱ्या मेळाव्यात मुस्लिम समाज आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती तौफिक शेख यांनी दिली.
अभी नही तो कभी नही, माहोल बदलने वाला है,असा बॅनर लावून पत्रकार परिषद घेत मुस्लिम समाजाने शहर मध्य मतदारसंघ महाविकास आघाडीकडून मुस्लिम समाजाला उमेदवारी देण्याची मागणी केलीय.
चौकट – मुस्लिम समाजाला न्याय देण्यासाठी एकत्र आलो आहे. ११ मुस्लिम उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. त्यातील कोणालाही उमेदवारी द्यावी आम्ही पाठिंबा देऊ. एमआयएम ला आमचा विरोध नाही परंतु एमआयएम पक्षाने मुस्लिम समाजाचा काहीच फायदा झाला नाही. जर कदाचित मविआ कडून मुस्लिम समाजाला उमेदवारी दिली तर आम्ही फारूक शाब्दी यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करू. अशी माहिती मुस्लिम समाजाच्या पत्रकार परिषदेवेळी देण्यात आली.