शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांचा भाजपला इशारा
सोलापूर – सोलापूर शहर मध्य मतदारसंघ शिवसेनेला सुटला नाही तर भाजप विरोधात शिवसेना पाच जागा लढवणार आहे. आम्ही जिंकून नाही आलो तर चालेल पण भाजपच्या उमेदवाराला निवडून येऊ देणार नाही. असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
सोलापूर शहर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी चक्क पक्षाच्या विरोधात बंड पुकारले आहे. सोलापूर शहर मध्य ची जागा ही शिवसेनेलाच सुटावी अशी मागणी करण्यात आली. जर ही जागा शिवसेनेला सुटली नाही तर आमच्याकडे एबी फॉर्म नसले तरी पाच मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे पदाधिकारी उमेदवारी अर्ज दाखल करून भाजपचा उमेदवार पाडतील असा इशारा आज घेतलेला पत्रकार परिषदेत देण्यात आला आहे.
सोलापूर शहर मध्ये च्या जागेवर शिवसेनेचा पारंपारिक हक्क असून ती जागा मिळावी यासाठी सोलापूर शिवसेनेचे पदाधिकारी मुंबई येथे चार दिवस ठाण मांडून होते. मुंबई येथून सोलापुरात आल्यानंतर या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत बंडाचा पवित्रा घेतलाय.
सोलापूर शहर मध्य ची जागा शिवसेनेला सुटावी अन्यथा शिवसेनेचे शहर प्रमुख मनोज शेजवाल हे शहर मध्य मतदार संघातून, शहर उत्तर मतदार संघातून जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, अक्कलकोट मतदार संघातून अभिजित पाटील चपळगाव, दक्षिण सोलापूर मतदार संघातून अण्णासाहेब सत्तुबार व उमेश गायकवाड आणि मंगळवेढा मतदार संघातून उमेश चौंडे उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी दिली.
याप्रसंगी जिल्हाप्रमुख अमोल शिंदे शहरप्रमुख मनोज शेजवाल, उपजिल्हाप्रमुख अन्नप्पा सतूबार,तुकाराम मस्के, हरिभाऊ चौघुले, युवासेना जिल्हाप्रमुख उमेश गायकवाड, सागर शितोळे, राजकुमार शिंदे आणि महिला पदाधिकारी उपस्थित होते.
चौकट –
भाजपचे सोलापुरातील सगळे उमेदवार पाडू – अमोल शिंदे
सोलापूर शहर मध्य विधानसभा मध्ये शिवसेनेचे मोठे प्राबल्य असून या ठिकाणी शिवसेनेचे आमदार ही निवडून आलेले आहेत त्यामुळे शिवसेनेला हा मतदारसंघ सोडावा, भाजपाने सोलापूर जिल्ह्यातील इतर मतदारसंघात आपले आमदार असताना शहर मध्य कशाला हवा आहे, शहर मध्ये भाजपाकडे उमेदवार नसताना देखील त्याने उमेदवार आयात करून शिवसेनेवर लादण्याचा प्रयत्न केलाय, हे कदापि शिवसेना सहन करणार नाही, भाजपाचे शहर जिल्ह्यातील सर्व उमेदवार पाडू.
– जिल्हाप्रमुख अमोल शिंदे
‘हम तो डूबेंगे सनम, पर तुमको भी ले डूबेंगे’ – मनोज शेजवाल
शिवसेना संपवण्याचा घाट भाजप ने घातला आहे. आमच्या कडे पाच उमेदवार असताना भाजपा बाहेरचा उमेदवार आमच्यावर लादत आहे. आमचा ह्या उमेदवारीला विरोध तर आहेच, पण आम्हाला आमच्या शिवसेनेचा उमेदवार पाहिजे. जेणेकरून जिल्ह्यात सेनेचे अस्तित्व टिकले पाहिजे. भाजप आमच्यावर अन्याय करत आहे. परंतु हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. ‘हम तो डूबेंगे सनम, पर तुमको भी ले डूबेंगे’ अशी शायरी करत शिवसेना शहरप्रमुख मनोज शेजवाल यांनी इशारा दिला.
– शिवसेना शहरप्रमुख, मनोज शेजवाल