सोलापूर – सोलापुरातील महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे. सोलापूर शहर मध्य मतदार संघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून माजी महापौर महेश कोठे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली होती.
त्यावेळी बोलताना सेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे म्हणाले,
शिवसेनेत आजवर केलेल्या बंड आणि चुकांची महेश कोठे यांनी माफी मागावी. शिवसेनेतून निवडून आलेल्या २२ नगरसेवकांपैकी १६ नगरसेवक फोडून राष्ट्रवादीत नेले. महेश कोठेंनी शिवसैनिकांचे आणि शिवसेनेचे नुकसान केले आहे. महेश कोठेंची भूमिका नेहमी शिवसेनेच्या विरोधात असते. कोठे मातोश्रीवर जाऊन पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची माफी मागत नाहीत किंवा दिलगिरी व्यक्त करत नाहीत तो पर्यंत शिवसैनिक उत्तर विधानसभा मतदार संघात त्यांचा प्रचार करणार नाही. असे वक्तव्य बरडे यांनी केले होते.
त्यावर आज महाविकास आघाडीचे उमेदवार महेश कोठे यांनी शक्तीप्रदर्शन करत पदयात्रा काढली आणि उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी शिवसेना ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे.
माजी महापौर महेश कोठे म्हणाले,
हे तर मालकांचे दलाल आहेत असा आरोप महेश कोठेंनी नाव न घेता केला. यावेळी बोलताना पुढे म्हणाले..
उद्धव ठाकरे आणि माझी भेट झाली आहे. हे फक्त स्टंटबाजी करत आहेत. हे मालकांचे दलाल आहेत, वातावरण खराब करण्याचे काम करत आहेत. माझी चूक असेल आणि खरच माफी मागावी वाटत असतं तर मला येऊन भेटले असते. मला न भेटता पत्रकार परिषद घेऊन वातावरण खराब करण्याचे काम सुरु आहे. फक्त ते ज्याचे मीठ खाल्ले त्याच्याशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न, पक्षाशी जर प्रामाणिक राहिले असते तर पक्ष वाढला असता. पण पक्षाशी प्रामाणिक न राहता दमड्याशी प्रामाणिक राहणाऱ्या लोकांचा हा डाव आहे.असा आरोप महेश कोठे यांनी यावेळी केला.