महाविकास आघाडीचे उमेदवार चेतन नरोटेंचे जोरदार शक्ती प्रदर्शन ; भरला उमेदवारी अर्ज
सोलापूर – सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार चेतन नरोटे यांनी आज भव्य सभा घेऊन मतदारांना मतदान करण्याचे जाहीर आवाहन केले. याप्रसंगी त्यांना गहिवरून आले. डोळ्यात आनंदाश्रू घेऊन त्यांनी खासदार प्रणिती शिंदे तसेच शिंदे फॅमिलीचे आणि मतदारांचे आभार मानले.
दरम्यान सकाळी दहा वाजता रामलाल चौक येथे चेतन नरोटे यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी व्यासपीठावर खासदार प्रणिती शिंदे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, शहर उत्तरचे उमेदवार महेश कोठे, सुधीर खरटमल, पुरुषोत्तम बरडे, यू.एन. बेरिया आदींची उपस्थिती होती.
यावेळी खा. प्रणिती शिंदे यांनी भाजपवर जोरदार प्रहार करत भाजप सरकारने महिलांना पैसे देऊन मत विकत घेण्याचा घाट घातला आहे. मध्य मध्ये वेगळी गेम करण्याचा प्रयत्न भाजपने केला. परंतु तो गेम आता फसला आहे. त्यामुळे मतदारांनी जागृत राहून मतदान करण्याचे आवाहन केले.
त्याच प्रमाणे महेश कोठे यांनी देखील भाजपवर टीका करताना सुशील कुमार शिंदे यांनी केलेली कामे आम्ही केल्याचे भासवून श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आहे. तो फसवा प्रकार घडू नये यासाठी मतदार जागरूक रहा असे आवाहन केले.
चौकट – भाषणावेळी चेतन नरोटे यांना अश्रू अनावर –
गेली २५ वर्षे मी आपल्या भागाचा नगरसेवक म्हणून काम करतो. वयाच्या २१ वर्षी लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला. माझे वडील, आजोबा मील कामगार, तुम्ही एका मील कामगाराच्या मुलाला आमदारकीचे तिकीट दिलं. तुमच्या सर्वांचे ऋण मी कधी फेडू शकणार नाही. यावेळी बोलताना चेतन नरोटे यांना अश्रू अनावर झाले म्हणाले, सर्वसामान्य परिवारातील माणसाला आमदारकीचे तिकीट मिळाले, शिंदे परिवाराचे ऋण कधी फेडू शकणार नाही. उद्या आमदार जरी झालो तरी तुमचे उपकार कधीही विसरू शकणार नाही. गेली २९ वर्ष झाले मी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिल्याने मला आज हे फळ मिळाले.
– चेतन नरोटे, काँग्रेस उमेदवार
चौकट – शहर मध्य दुसऱ्याच्या हातात जाता कामा नये – प्रणिती शिंदे
पंधरा वर्ष मी ज्या मतदार संघाचे नेतृत्व केलं, तो मतदार संघ अश्या हातात सोपवत आहे. जे गोर गरिबांना न्याय देतील. मी माझी जबाबदारी पूर्ण केली, आता तुम्ही तुमची जबाबदारी पूर्ण करा. जात, धर्म बाजूला ठेवून एवढा चांगला उमेदवार निवडून आणायचा आहे. शहर मध्य दुसऱ्या कोणाच्या हातात गेलेलं आपल्याला चालणार नाही. १५ वर्ष लहान बाळासारखे ह्या मतदार संघाला सांभाळले. काँग्रेसवर जिवापाड प्रेम करणारे मध्य चे लोक आहेत. भाजपचे लोक जाती – पातीचे राजकारण करून आपल्याला तोडायचा प्रयत्न करत आहेत. चेतन नरोटे यांची उमेदवारी जाहीर झाल्याने विरोधकांच्या छातीत धडकी बसली असेल. महाविकास आघाडी एक स्थिर सरकार महाराष्ट्राला देणार आहे.
– प्रणिती शिंदे, खासदार