शिवसेनेच्या विचारांशीच आम्ही पाईक ; भाजपच्या अन्यायामुळे घेतला हा निर्णय
सोलापूर – शिवसेनेचे तिन्ही जिल्हाप्रमुखांसह, शहर प्रमुखांनी बंडखोरी केली असून छत्रपतींच्या स्वराज्य पक्षातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आम्ही शिवसेनेच्या विचारांशीच पाईक आहोत परंतु भाजपच्या अन्यायामुळे आम्ही हा निर्णय घेतला असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
सोलापूर शहरातील जागावाटपामुळे कार्यकर्ते महायुतीतून बाहेर पडले . सोलापूर शहर मध्यच्या जागेवरून शिवसैनिकांमध्ये प्रचंड रोष होता. वास्तविक शहर मध्यची जागा ही शिवसेनेला सुटणार हे जवळपास निश्चित झाले होते. शिवसेनेतील अंतर्गत वादामुळे ती जागा भाजपच्या वाट्याला आली. शिवसेनेचे चारही जिल्हाप्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शहर मध्यच्या जागेवरून तटस्थ होते. मात्र, पक्ष श्रेष्ठींकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराज होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर निकटवर्तीय मानले जाणारे समर्थक जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, मनीष काळजे, उमेश गायकवाड शहरप्रमुख मनोज शेजवाळ यांनी अखेर शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र स्वराज पक्षाचे पक्षप्रमुख छत्रपती खा. संभाजी राजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र स्वराज पक्षात प्रवेश केला.
सोलापूर शहर मध्य ची जागा शिवसेना शिंदे गटाला न सोडल्याने सोलापुरातील शिवसैनिकांनी बंडाचा पवित्रा हातात घेतला आहे. छत्रपती संभाजी राजे यांच्या स्वराज्य पक्षात सोमवारी प्रवेश केला असून मंगळवारी दुपारी जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
यावेळी अमोल शिंदे, मनीष काळजे, मनोज शेजवाल, उमेश गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते.
चौकट –
स्वराज्य पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल –
सोलापूर शहर उत्तर – अमोल शिंदे
सोलापूर शहर मध्य – मनीष काळजे
सोलापूर दक्षिण – उमेश गायकवाड
कोट –
लोकसभेत आम्हाला ग्रहित धरले जाते परंतु विधानसभेत आम्हाला ग्रहित धरले गेले नाही. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत भाजपने २५ प्रभागातून २५ जागा शिवसेनेला दिल्या तर आम्ही त्यांच्यासोबत गेलो असतो पण त्या गोष्टीला त्यांचा नकार. एकीकडे भाजपा अन्याय सहन करायचा आणि महाराष्ट्रामध्ये दुसरीकड छत्रपती संभाजी महाराजांन सारखा एक पर्याय आमच्या समोर असताना आम्ही स्वीकारायचा ठरविले. सोलापुरातील सगळी शिवसेना स्वराज्य पक्षात विलीन करुन छत्रपतींच्या पाठी मागे राहण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रामध्ये जरांगे फॅक्टर चालल्यानंतर चांगल्या चांगल्यांचे धागे दणाणतात. लोकसभेत जरांगे फॅक्टर चालल्यामुळे सर्व घडामोडी घडल्या आणि आता विधानसभेत सुद्धा जरांगे फॅक्टर जोरात चालणार.
⁃ अमोल शिंदे, उमेदवार, स्वराज्य पक्ष
शहर मध्य विधानसभा शिवसेनेची पारंपरिक विधानसभा आहे. मुख्यमंत्र्याच्या आदेशावरुन शिवसेना पक्ष वाढवला पण मित्र पक्षाकडून ह्या जागेवर अतिक्रमण करण्यात आले. भाजपने सामान्य परिवारातील, जुन्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली असती तर तो ही भाग वेगळा होता परंतु सहा महिन्याखाली आलेल्या माणसाला उमेदवारी देऊन भाजपने महायुतीचा विश्वास घात केला आहे. लोकांच्या आग्रहाखातीर निवडणुकीच्या रिंगणात,
आम्ही पक्ष बदललो ह्या पेक्षा आम्ही भगवा स्वीकारला आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे, स्व. आनंद दिघे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचाराशी आम्ही पाईक परंतु अन्याया विरुद्ध लढण्याची शिकवण ह्यानीच आम्हाला दिली. शिवसैनिकांवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात आम्ही उमेदवारी भरतोय.
– मनीष काळजे, उमेदवार