प्रतिनिधी / प्रसाद दिवाणजी
सोलापूर – वांग्याचे भरीत आणि भाकरी हे तसं महाराष्ट्रीय खाद्य संस्कृतील खाद्यपदार्थ. मात्र, वांग्याचे भरीत आणि भाकरी बनविण्यामागे काही खास वैशिष्ट्ये आहेत.
विशेषतः चंपाषष्टीला करण्याची प्रथा आहे. याच काळात भरताचे वांगे देखील महागतात. सध्या बाजारात भारताच्या वांग्याला 60 ते 70 रुपये किलो दर आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडोबा म्हणते मार्तंड भैरवाची चंपाषष्टीला मोठी यात्रा असते. पुण्यातील जेजूरीसह महाराष्ट्रातील जिथे-जिथे खंडोबाचे देवस्थान आहे तिथे चंपाषष्टीला खास पुजा-अर्चा आणि यात्रा असते. खंडोबा महाराष्ट्राचे कुलदैवत असल्याने चंपाषष्टीला घराघरात सुघट आणि तळी भरली जाते. त्याच दरम्यान भरताच्या वांग्याचा आणि बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. आणि तोच प्रसाद म्हणून वाटला जातो.
शुद्ध पंचमीस सायंकाळी बाजरीच्या पीठाचे पाच दिवे व दोन मुटके पत्रात घेऊन देवास ओवाळतात. ते पात्र देव घरा समोर बाजरीची रास करून त्यावर ठेवतात. षष्टी दिवशी देवाची पुजा केली जाते व भरीत (वांगे व कांदा यांची भाजी) कांद्याची पात, रोडगा (बाजरीच्या पिठात वांग्याची भाजी, पात, दुध घालून केलेली दामटी) यांचा नेवेध्य दाखवतात व पुरण पोळीचा ही नेवेध्य दाखवतात तसेच पुरण घालून कणकीचे उकडून तयार केलेल्या पाच दिव्यांनी व दोन मुटक्यांनी देवास ओवाळतात व तळी उचली जाते. कोठंबा भरला जातो व कुत्र्यास घास दिला जातो. सहा दिवस सोडलेल्या माळा उतरून घट समाप्ती होते. देवास दाखवलेला भरीत व रोडग्याचा नेवेद्य प्रसाद म्हणून भक्षण करून यजमान उपवास सोडतात.
खंडेरायाला भरीत व रोडग्याचा नेवैद्य का?
यामध्ये काही अख्खायिका सांगितल्या जातात. त्यात खंडोबा वांग्याचे भरीत प्रिय असल्याने त्याचा नैवेद्य केला जातो, आणि तीच प्रथा आजही सुरू आहे.
नवरात्रीप्रमाणे खंडेरायाचा चंपाषष्टी असतो. जिथे-जिथे खंडोबाचे देवस्थान आहे तिथे-तिथे हा उत्सव पार पडत असतो. आणि नवरात्रप्रमाणेच हा उत्सव खंडोबा भक्त साजरा करत असतात. त्यामुळे मार्तंड भैरव म्हणजेच खंडोबाला या दिवशी आवडीचा नैवेद्य केला जातो.
महिला, पुरुष करतात चातुर्मास उपवास –
चातुर्मास उपवास म्हणजे आषाढी शुद्ध एकादशी पासून ते कार्तिक शुद्ध एकादशी असा चार महिन्यांचा कालावधी असतो. यात आषाढ महिन्याचे वीस दिवस, श्रावण, भाद्रपद आणि अश्विन या तीन महिन्यांचे संपूर्ण ३० दिवस आणि कार्तिक महिन्याचे पहिले अकरा दिवस समाविष्ट असतात. या दिवसांमध्ये मुळा, वांगे, कांदा, लसूण खाण्यापासून व अतिप्रमाणात जेवणापासून दूर राहतात. तर घटस्थापने दिवशी श्री खंडेरायांना भरीत व रोडग्याचा नेवैद्य दाखवून ह्या उपवास सोडण्यात येतो. मात्र काहीजण घटस्थानेपासून चंपाषष्टी पर्यंत असा पाच दिवसांचा उपवास करत असतात.
मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजेच चंपाषष्ठी, या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणी-मल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रगट झाले. नवरात्राचे पाच दिवस उपवास करून सहाव्या दिवशी तो सोडतात. सहा दिवस देवापुढे नंदादीप ठेवतात. देवाला बेल, दवणा व झेंडूची फुले फार प्रिय म्हणून ती आठवणीने वाहतात.
खंडोबाच्या उपासनेत भंडारा (हळदीची पूड) फार महत्त्वाचा आहे. खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्ठी या दिवशी ठोम्बरा (जोंधळे शिजवून त्यात दही व मीठ घातलेले), कणकेचा रोडगा, वांग्याचे भरीत, पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यात असतात. देवाला नैवेद्य देण्यापूर्वी तळी भरण्याचा विधी असतो.
तळी भरणे म्हणजे एका ताह्मणात विड्याची पाने, पैसा, सुपारी, भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते ताह्मण “सदानंदाचा येळकोट’ किंवा “येळकोट येळकोट जय मल्हार’ असे मोठ्याने तीन वेळा म्हणत उचलतात, नंतर दिवटी-बुधली घेऊन आरती करतात. देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळून प्रसाद वाटला जातो.
⁃ गणेश पुजारी, मानकरी