सोलापूर प्रतिनिधी –
वोट भी दो, नोट भी दो!
सोलापूर शहराला दररोज पाणीपुरवठा करणार !
झोपडपट्टीधारकांना पक्क्या घरांसाठी रु. ५ लाख अनुदान मिळवून देणार !
सोलापूर – ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्र विधान सभेची निवडणूक लागणार आहे. त्या अनुषंगाने भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) च्यावतीने महाराष्ट्रात प्रमुख व प्राबल्य ठिकाणी किमान १२ जागांवर निवडणूक लढविणार आहे. वास्तविक पाहता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा जनवादी आणि वर्ग संघर्ष करणारा पक्ष आहे. जनतेच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि मुलभूत समस्यांना घेऊन ते प्रश्न धसास लावण्यासाठी लाल बावटा नेहमीच आक्रमक व अग्रेसर राहतात व जनआंदोलनाच्या माध्यमातून लोकांना न्याय मिळवून देण्याचे केले जाते.
प्रामुख्याने कामगार, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, मध्यमवर्गीय, युवा, विद्यार्थी, महिला आदिवासी, बहुजन, अल्पसंख्यांक यांच्यासाठी अव्याहतपणे लढत असताना संघर्ष करण्यासाठी आर्थिक पाठबळाची गरज असते. मोर्चे, धरणे आंदोलन, पोलीस खटले व न्यायालयीन लढयासाठी जनतेतून संघर्ष निधी उभा केला जातो. तसेच सर्वसामान्यांचे प्रतिनिधी विधानसभेत पाठविण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने निवडणूक निधी संकलन मोहीम हाती घेतले असून ‘वोट भी दो, नोट भी दो’ चा नारा करण्यात येत आहे.
महापालिकेवर प्रशासकीय राजवट येऊन अनेक महिन्यांहून अधिक कालावधी उलटून गेला आहे. निवडणुकांच्या हालचाली नाहीत. मूलभूत नागरी समस्यांबाबत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. सदस्यांची मुदत संपल्यानंतर शहराचा कारभार प्रशासकांनी हाती घेतला.
राज्यातील सत्ता बदलात शहरातील अनेक प्रभागांत प्रस्तावित केलेली विकासकामे खोळंबून राहिली. काही कामे निधी नसल्याने तर काही कामे एकमेकांच्या विरोधातील शह-काटशहमुळे प्रलंबित राहिली आहेत. यंदाच्या जोरदार पावसाळ्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची वाट लागली आहे. परंतु तातडीचे निधी मंजुरीअभावी अंतर्गत आणि मुख्य रस्त्यांची कामे व्हायला अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. याशिवाय पिण्याच्या पाण्याची समस्या, ड्रेनेज, कचरा, निवारा या समस्या ऐरणीवर आहेत.
२६ जून २०२४ रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जनतेचा कौल घेण्यासाठी निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात महाराष्ट्र राज्याची राजकीय परिस्थिती अस्थिर आणि सत्तापिपासू बनली आहे. जनतेच्या हिताला मूठमाती दिली आहे. त्यामुळे जनता हवालदिल झाली आहे. जनतेचे प्रश्न धसास लावण्यासाठी आज जनतेने मला पुन्हा निवडणूक लढवण्याचा आग्रह करत उत्स्फर्तपणे कौल दिलेला आहे याचे स्वागत करत असून जनतेने माझ्यावर जो विश्वास आणि प्रेम दाखवून प्रामाणिकपणे मला निवडून आणण्याचा निर्धार केलेला आहे. त्यास मी बांधली राहीन असे नम्रपणे ऋण निर्देश व्यक्त केले.
सोलापूर जिल्ह्यात कामगार चळवळीच्या माध्यमातून गेल्या ५ दशकापासून सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉ. नरसय्या आडम (मास्तर) हे सातत्याने निवडणुका लढवीत आहेत. या दरम्यान तीनवेळा आमदार म्हणून महाराष्ट्र विधान सभेत उल्लेखनीय कार्य करून ‘उत्कृष्ट विधानसभा पटू’ चा मान मिळवले. सध्या राज्यात लोकशाही अधिष्ठित महाविकास आघाडीच्या वतीने सोलापूर शहरमध्य विधान सभा जागेसह राज्यातील १२ जागांबाबत माकपाचे नेतृत्वाने १५ जून २०२४ रोजी मा. शरदचंद्र पवार, दि. २४ जून २०२४ रोजी कॉंग्रेसचे मा. नाना पटोले यांना भेटून महाविकास आघाडीबाबत सकारात्मक चर्चा केलेली आहे. त्याचबरोबर शिवसेना प्रमुख मा. उद्धव ठाकरे यांना लवकरच भेटणार आहेत. तसेच कॉंग्रेसच्या नेत्या मा. सोनिया गांधी व मा. मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी माकपाचे महासचिव कॉ. सीताराम येचुरी हे आघाडीच्या एकजूटीसाठी दिल्ली येथे भेट घेणार असून त्यासाठी माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) हे जाणार आहेत. नक्कीच शहरमध्यची जागा आघाडीचा धर्म म्हणून माकपाला मिळण्याचे संकेत आहेत.
सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासाचा उद्दिष्टनामा
१. सोलापूर शहराला दररोज नियमित मुबलक पाणी पुरवठा करणार.
२. सोलापूर शहर झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी पंतप्रधान आवास योजनाअंतर्गत ५ लाख रुपये अनुदान मिळवून देणार.
३. जगातील ३० हजार असंघटीत कामगारांचा महत्वाकांक्षी, पथदर्शी गृहनिर्माण प्रकल्प रे नगर च्या लाभार्थ्यांना वाढीव २ लाख १० हजार अनुदान मिळवून देऊ.
४. शहरातील मृतप्राय रस्त्यांची दुरुस्ती व नवीन रस्ते करणार.
५. सोलापूरातील सुशिक्षित, बुद्धीजीवी तरुणांना रोजगार देण्यासाठी आय.टी. इंडस्ट्री आणणार.
६. सोलापूरातील यंत्रमाग व रेडीमेड शिलाई कामगारांसाठी टेक्सस्टाईल पार्क उभारणार.
७. सोलापूर महानगरपालिका अंतर्गत सर्व दवाखाने व आरोग्य सुविधा गुणवत्तापूर्ण व सुसज्ज करणार.
८. शहर हद्दवाढ भागातील नागरिकांसाठी असलेले जाचक युजर्स चार्जेस रद्द करण्यास भाग पाडणार.
९. सोलापूर महानगरपालिका अंतर्गत प्रादेशिक भाषांच्या शाळा (तेलुगु, उर्दू, कन्नड) पूर्ववत करणार.
१०. सोलापूरातील क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी असलेल्या व्यायाम शाळा, अभ्यासिका, क्रीडांगणे आदी अद्यावत करणार.
११. सोलापूर शहर प्रदूषणमुक्त करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन करणार.
१२. सोलापूरातील पद्मशाली समाज बांधवांसह विणकर समाजाच्या उन्नतीसाठी महर्षी मार्कंडेय कल्याणकारी महामंडळ करण्यास भाग पाडू.
१३. अल्पसंख्यांक समाजासाठी नौकरी व शिक्षणात ५ टक्के आरक्षण मिळवून देणार.
१४. सार्वजनिक वितरण प्रणाली मजबूत करा व मागेल त्याला प्रत्येक कुटुंबाला ३५ किलो धान्य देण्यास भाग पाडू.
१५. कामगारांनी रक्तरंजित क्रांती करून मिळविलेले ४४ कामगार कायद्यांचे ४ कामगार संहितेत रुपांतर करून प्रतिगामी बदल रद्द करण्यास भाग पाडू.
१६. २०१६ पासून विडी कामगारांसाठी अस्तित्वात असलेले कल्याणकारी मंडळ निष्क्रिय झाले असून कामगारांना मिळणारे लाभ बंद केले आहेत ते पूर्ववत सुरु करण्यास भाग पाडू.
१७. विडी कामगारांना फरकासहित किमान वेतन रु.२१० व महागाई भत्ता रु. १४७.६१ असे एकूण रु. ३५७.६१ किमान वेतन लागू करण्यास भाग पाडू.
१८. विडी कामगारांना कारखान्यातच रोख मजुरी मिळवून देऊ.
१९. असंघटीत कामगारांना कोशियारी कमिटीच्या शिफारसीनुसार ७५०० रुपये पेन्शन व २५०० रुपये महागाई भत्ता असे एकूण १०००० रुपये मिळवून देऊ.
२०. यंत्रमाग कामगारांना माथाडी कायद्याच्या धर्तीवर यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करून सर्व कामगार कायद्यांचे लाभ मिळवून द्या व सामाजिक सुरक्षा लागू करा.
२१. यंत्रमाग कामगारांना फरकासहित किमान वेतन व महागाई भत्ता दरमहा १५७९७/- रुपये मिळावे, ओळखपत्र, हजेरी कार्ड, पगार पत्रक कारखानदारामार्फत मिळावे व यंत्रमाग कामगारांची सहा. कामगार आयुक्त कार्यलयात नोंदणी करण्यास भाग पाडू.
२२. रे नगरच्या लाभार्थ्यांना नाममात्र व परवडणाऱ्या दरात सौरऊर्जा मिळवून देऊ.
२३. रे नगरची अकृषिक आकारणी शुल्क रद्द करण्यास भाग पाडू.
२४. रे नगर फेडरेशन च्या कुर्बान हुसेन अल्पसंख्यांक महिला कामगार सहकारी गृह. संस्था, कॉ. एम.के.पंधे यंत्रमाग कामगार सहकारी गृह.संस्था तसेच कॉ.मीनाक्षीताई साने महिला विडी कामगार सह.गृह.संस्था यांना ६७ एकर जागेवरील वरील अटी-शर्ती शिथिल करण्यास भाग पाडू.
२५. रे नगर फेडरेशनच्या आर्थिक दुर्बल घटकातील लाभार्थ्यांना लावण्यात आलेल्या १ टक्का लेबर सेस रद्द करण्यास भाग पाडू.
२६. आशिया खंडातील सर्वात मोठे एकमेव महिला विडी कामगारांचा गृहनिर्माण प्रकल्प कॉ.गोदुताई परुळेकर वसाहतीतील सांडपाणी, मलनिस्सारण सर्वेक्षण झाले असून यासाठी ७५ कोटी रुपये निधीची आवश्यकता आहे. तो निधी तात्काळ देण्यास भाग पाडू.
२७. २००६ साली केलेल्या रस्त्यांचे अद्यापही पुनःडांबरीकरण झालेले नसून कॉ.गोदुताई परुळेकर वसाहतीतील १६ कि.मी. अंतर्गत रस्त्यांसाठी ९ कोटी ७५ लाख निधीची आवश्यकता आहे. सदर निधी मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यास भाग पाडू.
२८. कॉ.मीनाक्षीताई साने महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या लाभार्थ्यांना रे नगरच्या धर्तीवर मुद्रांक शुल्क नाममात्र दर १००० रुपये लागू करण्यास भाग पाडू.
२९. महाराष्ट्रातील हातमाग कामगारांसाठी जाहीर केलेल्या शासन निर्णयामध्ये हातमाग कामगार विणल्या जाणाऱ्या सिल्क साडीचा समावेश करून फेर शासन निर्णय जाहीर करून सर्व हातमाग कामगारांना उत्सव भत्ता मिळवून देऊ.
३०. रेडीमेड-शिलाई कामगारांना कामगार कायदे लागू करून किमान वेतन, सामाजिक सुरक्षा मिळवून देऊ.
३१. भ्रष्टाचार निर्मुलन करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंध कायदा मजबूत करण्यास भाग पाडू.
या पत्रकात परिषदेत पक्षाचे ॲड.एम.एच. शेख, नसीमा शेख,सिद्धाप्पा कलशेट्टी,नलिनी कलबुर्गी, युसुफ शेख मेजर, व्यंकटेश कोंगारी, कुरमय्या म्हेत्रे, शेवंता देशमुख, सुनंदा बल्ला, म.हनीफ सातखेड,रंगप्पा मरेड्डी, शंकर म्हेत्रे,मुरलीधर सुंचू, ॲड.अनिल वासम आदींची उपस्थिती होती.