Solapur News –
सोलापूर : शांत, संयमी आणि विनम्र स्वभाव असलेल्या ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी यांच्या निधनामुळे आपल्यातील समाजाभिमुख आणि अष्टावधानी पत्रकारिता करणारे ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व हरपले असून ती पत्रकारिता नव्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरणारी आहे.त्यांचा वैचारिक वारसा नव्या पिढीने जपला पाहिजे, अशा शब्दांत त्यांच्या निधनाबद्दल मान्यवरांनी शोक व्यक्त केला.
कल्पना टॉकीज जवळील गुजरात भवन येथे गुरुवारी सोलापूर श्रमिक पत्रकार संघातर्फे संघाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार अविनाश व्यंकटेश कुलकर्णी यांच्या निधनाबद्दल आयोजित
शोकसभेत विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले होते.
प्रारंभी त्यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.प्रास्ताविक श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी केले. यावेळी त्यांनी अविनाश कुलकर्णी यांच्या सहवासात काम करताना त्यांच्याकडून आपल्याला खूप काही शिकता आल्याचे सांगून त्यांच्या निःस्वार्थी पत्रकारितेचा गौरवपूर्ण शब्दात उल्लेख केला.तसेच त्यांच्या कुटुंबावर झालेल्या या आघातामुळे पत्रकार संघ कायम त्यांच्या कुटुंबासोबत राहील, अशी ग्वाहीदेखील दिली.
ज्येष्ठ पत्रकार नारायण कारंजकर म्हणाले, जागरूक पत्रकारिता कशी करावी हे अविनाश कुलकर्णी यांनी दाखवून दिले असून त्यांनी आदर्श पत्रकारिता केली आहे.
ज्येष्ठ पत्रकार शांतकुमार मोरे म्हणाले, कुलकर्णी यांनी काम करताना कोणताही बडेजाव न करता आपल्या कामाचा ठसा उमटवला. समाजासाठी आणि पत्रकारितेसाठी त्यांनी अमूल्य योगदान दिले.
ज्येष्ठ पत्रकार संजीव पिंपरकर म्हणाले, पत्रकारिता करताना कशी केली पाहिजे याचा आदर्श आपण अविनाश यांच्या पत्रकारितेतून घेतला पाहिजे. नव्या पिढीने त्यांच्या विचारांचा वारसा जोपासण्याची गरज आहे.
ज्येष्ठ पत्रकार प्रशांत माने म्हणाले, अविनाश कुलकर्णी यांच्या निधनाने पत्रकारितेची खूप मोठी हानी झाली असून ही पोकळी कधीही न भरून येणारी आहे.
श्रीकांत कांबळे म्हणाले, बदललेल्या पत्रकारितेच्या काळात अविनाश कुलकर्णी यांचे निधन होणे आपल्यासाठी मोठी कठीण आणि न पेलविण्यासारखी गोष्ट आहे.
जाहिरात एजन्सी संघटनेचे प्रतिनिधी संदीप जव्हेरी म्हणाले, अविनाश कुलकर्णी यांच्या निधनामुळे ध्येयाभिमुख पत्रकारिता करणारे व्यक्तिमत्त्व लोप पावल्याने सोलापूरच्या पत्रकारितेची खूप मोठी हानी झाली आहे.
दरम्यान, यावेळी सोलापूर बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. सुरेश गायकवाड,श्री विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष विजय शाबादे, ज्येष्ठ पत्रकार भगवान परळीकर,
संजय येऊलकर,नंदकुमार येच्चे, कृष्णकांत चव्हाण, प्रा. बाळासाहेब भास्कर, सामाजिक कार्यकर्ते दत्ता भोसले, रवींद्र नाशिककर,वर्गमित्र अजित ढोके आदींनीही मनोगत व्यक्त करून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
या शोकसभेस अविनाश कुलकर्णी यांचे बंधू अजित कुलकर्णी,पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी , पाटील मंडप कॉन्ट्रॅक्टरचे शशिकांत पाटील, विजयकुमार देशपांडे, संतोष उदगिरी, दत्तात्रय मेनकुदळे, महापालिका पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण बनसोडे यांच्यासह पत्रकार व विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार दशरथ वडतिले यांनी केले.
कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ पुरस्कार देण्याची सूचना
ज्येष्ठ पत्रकार अविनाश व्यंकटेश कुलकर्णी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून दरवर्षी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शहराच्या प्रश्नांसंदर्भात मांडणी करणाऱ्या पत्रकाराला श्रमिक पत्रकार संघातर्फे रोख रक्कमेचा पुरस्कार देऊन गौरविण्यात यावे. त्यासाठी आपण पाच हजाराची दरवर्षी मदत करू, अशी ग्वाही त्यांच्या एका घनिष्ठ मित्राने शोकसभेत दिली.
सोलापूरः ज्येष्ठ पत्रकार अविनाश व्य. कुलकर्णी यांच्या निधनाबद्दल आयोजित शोकसभेत त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, बंधू अजित कुलकर्णी, संजीव पिंपरकर, एड. सुरेश गायकवाड व अन्य.