Movie News –
बाबू नाय, बाबू शेठ म्हणत, अस्सल कोळी भाषेचा जलवा दाखवणारा स्टायलिश ‘बाबू’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा दणक्यात पार पडला. यावेळी कलाकारांनी चित्रपटातील व्यक्तिरेखांच्या पेहरावात आगरी बेंन्जोच्या तालावर खास कोळी स्टाईलने नृत्य करत दमदार एंट्री केली. तर ‘बाबू’नेही त्याच्या अनोख्या अंदाजात बाईकवरून भन्नाट एन्ट्री घेतली. यावेळी ‘बाबू’ची भूमिका साकारणाऱ्या अंकित मोहनचा एक वेगळाच स्वॅग पाहायला मिळाला. आपल्या कोळी बांधवांना, भगिनींना घेऊन तो ही या कोळी नृत्यात सहभागी झाला. या उत्साहाने भरलेल्या वातावरणात अंकितच्या २० फूट पोस्टरचे अनावरणही करण्यात आले. या भव्य सोहळ्यात चित्रपटातील कलाकार, दिग्दर्शक, निर्माते, इतर टीमसह कोळी बांधवही सहभागी झाले होते.
प्रदर्शित झालेला ट्रेलर पाहून प्रेक्षकांची ‘बाबू’विषयीची उत्सुकता अधिकच वाढली आहे. यात ‘बाबू’च्या आयुष्यातील प्रेम, शत्रु आणि सूडभावना, जबरदस्त ॲक्शन दिसत आहे. त्याच्या आयुष्यात नेमके काय होते, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना हा चित्रपट पाहावा लागेल.
चित्रपटाबद्दल दिग्दर्शक मयूर शिंदे म्हणतात, ” मराठीत पहिल्यांदाच असा आगरी कोळी भाषेचा झणझणीपणा अनुभवायला मिळणार आहे. ९०च्या दशकातील ही कथा प्रेक्षकांना नोस्टॅल्जिक करणारी आहे तर तरूणाईला जुन्या काळातील प्रेमाचा अंदाज दाखवणारा हा चित्रपट आहे. यात प्रेम, मैत्री, दुरावा, शत्रुत्व, बदला, ॲक्शन अशा सगळ्याच गोष्टी आहेत. त्यामुळे मनोरंजनाचे हे एक परिपूर्ण पॅकेज आहे.’’
श्री समर्थ कृपा प्रोडक्शन प्रस्तुत ‘बाबू’ या चित्रपटाची निर्मिती सुनीता बाबू भोईर यांनी केली आहे. तर या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा मयूर मधुकर शिंदे यांनी सांभाळली आहे. अंकित मोहन, नेहा महाजन, रुचिरा जाधव, स्मिता तांबे , संजय खापरे, श्रीकांत यादव यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका असून येत्या २ ॲागस्टला ‘बाबू’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.