सोलापूर – सोलापूर ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस हवालदार इकबाल शेख यांनी आजतागायत पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी करून आपल्या कामाचा ठसा देशभरात उमटवलेला आहे. याच कामाची दखल विदेश मंत्रालयाने घेतली असून त्यांची मिनीस्ट्री ऑफ एक्सटरनल अफेअर्स, दिल्ली येथील विशेष प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. या पदासाठी महाराष्ट्रातून 34 अर्ज आले होते.मुलाखत 50 मार्काची, सर्विस रेकॉर्ड, अचीवमेंट्स या अशा पद्धतीने निवड करण्यात आली आहे. पोलिस हवलदार इकबाल शेख यांची निवड झाल्याने सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचा गौरव त्यांनी वाढविला आहे. परराष्ट्र मंत्रालयात निवड झालेले सोलापूर ग्रामीण जिल्हयातून ते पहिलेच पोलीस अंमलदार ठरले आहेत.
सन २००३ मध्ये इकबाल शेख पोलीस दलात रुजू झाले. संगणकीय व इतर तांत्रिक ज्ञानाच्या अनुभवामुळे त्यांना स्थानिक गुन्हे शाखा तसेच सीसीटीएनएस विभागात विविध महत्वाच्या कामाकरीता नियुक्त करण्यात आले. सीसीटीएनएस विभाग येथे कर्तव्यावर असताना इकबाल शेख यांनी सीसीटीएनएस प्रणालीमध्ये सोलापूर ग्रामीण जिल्हयास राज्यात अग्रस्थानिच ठेवून वैयक्तिक पदके व राज्यस्तरीय “फिरते चषक” मिळवून दिले आहे. तसेच अनेक कौशल्य स्पर्धांमध्ये सहभाग घेवून परिक्षेत्रिय, राज्यस्तरीय तसेच अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यांमध्ये प्राविण्य मिळवून ११ सुवर्ण, ९ रौप्य, १४ कांस्य पदके, राष्ट्रीय पारितोषिक, पोलीस महासंचालक पदक, ४० पेक्षा जास्त प्रशंसापत्रे पटकाविले आहेत.
आयपीएस’ दर्जाच्या अधिकाऱ्यांना देतात प्रशिक्षण-
इकबाल शेख यांची ‘सीसीटीएनएस’ प्रशिक्षक म्हणून विशेष ख्याती आहे. महाराष्ट्रातील सोलापूर, तुर्ची, नानवीज, जालना, खंडाळा इत्यादी पोलिस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत असलेल्या पोलिस प्रशिक्षणार्थी, १० ते २० वर्षे सेवा पूर्ण केलेले पोलिस अंमलदार यांचे प्रोफेशनल स्किल अपग्रेडेशन, पोलिस स्टेशन मॅनेजमेंट प्रशिक्षण सत्रांमध्ये प्रशिक्षण घेणारे अंमलदार, पोलिस उपनिरीक्षक ते पोलिस उपअधीक्षक व परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक (आयपीएस) दर्जाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना सीसीटीएनएस, गुन्हे प्रतिबंधक वः गुन्हे प्रकटीकरणाकरिता केंद्रीय गुन्हे अभिलेख केंद्र, दिल्ली व केंद्रीय गृह विभागाकडून उपलब्ध करून दिलेल्या विविध पोर्टल्सचा प्रभावी वापर या विषयांवर सखोल प्रशिक्षण देत आहेत.
परराष्ट्र मंत्रालयात निवड झालेले इकबाल शेख हे आजवरच्या काळातील सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातून पहिले पोलिस अंमलदार ठरले आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल विशेष पोलिस महानिरीक्षक वीरेश प्रभू, तत्कालीन पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक प्रितम यावलकर, पोलिस उपअधीक्षक विजया कुरी, पोलिस निरीक्षक विकास दिंडुरे, पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर, फिरोज तांबोळी आदींनी कौतुक केले आहे.