सोलापूर –
उत्तर सोलापूर तालुक्यातील बाणेगाव येथे बुधवारी सायंकाळी ५:३० वाजता मोहन पाटील यांच्या शेततळ्यात एक भला मोठा साप पडला आहे, अशी माहिती गणेश पाटील यांनी वाइल्डलाइफ कॉन्झर्वेशन असोसिएशन सोलापूरचे सुरेश क्षीरसागर यांना फोनवर कळवली. त्यानंतर काही वेळात क्षीरसागर व रोहित गावडे हे बाणेगावला रवाना झाले.
पाटील यांच्या शेतात पोहोचल्यानंतर शेततळ्याची पाहणी केली असता एक नाग प्रजातीचा विषारी साप साधारण साडेचार फूट लांबीचा शेततळ्यातून एका बाजूला वर येण्यासाठी धडपड करत होता. शेततळे हे साधारण १५ वाय २५ व १० फूट खोल होते. साप वर काढण्यासाठी पाटील यांच्या शेतातल्या घरातून दोरी घेतली व दोरी वॉलकंपाऊंडच्या खांबाला बांधून क्षीरसागर यांनी त्या दोरीच्या सहायाने शेततळ्यात उतरून त्या नाग प्रजातीच्या विषारी सापाला स्टिकच्या सहायाने अलगद उचलून शेततळ्यातून बाहेर काढले व जवळच निसर्गाच्या सान्निध्यात सुखरूप सोडून दिले. या बचाव कार्यासाठी सुरेश क्षीरसागर, रोहित गावडे, गणेश पाटील, भिवा बोराडे, शेखर कोल्ली, अझर मुजावर यांनी सहभाग घेतला व त्या विपारी सापाला शेततळ्यातून वर काढून जीवदान दिल्यावद्दल मोहन पाटील यांनी वाइल्डलाईफ कॉन्झर्वेशन असोसिएशनचे आभार मानले