सोलापूर –
ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता समाजाच्या सेवेसाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या स्मशान सेवेकऱ्यांना संभाजी आरमारने दिवाळी फराळ व साहित्य भेट दिली. या कुटुंबियांसमवेत फुलबाजी प्रज्वलित करून संभाजी आरमारने दिवाळीची सुरुवात केली. सोलापूर शहरातील सर्वच स्मशान भूमीत अशाप्रकारे निरपेक्ष सेवा बजावणारे दुर्लक्षित सेवेकरी कुटुंबाची दिवाळी देखील गोड व्हावी म्हणून संभाजी आरमार मागील अनेक वर्षांपासून दिवाळाची सुरुवात या कुटुंबाना फराळ आणि अन्य साहित्य भेट देऊन करत आहे.
मोदी स्मशान भूमी येथे संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे व कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे यांच्या हस्ते स्मशानात सेवा बजावणारे कुमार डोलारे, छोटू सुंदोळकर, मल्लेश घंटे, नागूबाई डोलारे, निर्मला सगले, शांताबाई सगले, लक्ष्मीबाई सगले यांना ही प्रातिनिधिक स्वरूपात भेट देण्यात आली. हा उपक्रम राबविण्यामागची भूमिका स्पष्ट करताना संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी समाजातील शेवटच्या माणसाची देखील काळजी घेण्याची छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण असून त्यामुळेच कर्तव्य भावनेने संभाजी आरमार सर्वसामान्य माणसाच्या भल्यासाठी काम करत असल्याचे सांगून सण, वार, उत्सव कशाचीही तमा न बाळगता निरपेक्ष सेवा बजावणाऱ्या या सेवेकरी बांधवांप्रती संभाजी आरमारला आदर असल्यामुळेच हा उपक्रम राबवित असल्याचे सांगितले.
याप्रसंगी कुमार डोलारे या स्मशान सेवेकरी बांधवाने प्रतिक्रिया देत असताना संभाजी आरमार मागील अनेक वर्षांपासून आमच्यासारख्या दुर्लक्षित घटकाला दिवाळीच्या आनंदात सहभागी करून घेत असल्याबद्दल समाधान व्यक्त करत संभाजी आरमारमुळे आमच्या सेवेचाच सन्मान होत असल्याची भावना व्यक्त केली. याप्रसंगी संभाजी आरमारचे प्रदेश संघटक प्रकाश डांगे, सरचिटणीस गजानन जमदाडे, उपाध्यक्ष शशिकांत शिंदे, शहरप्रमुख सागर ढगे, उपशहरप्रमुख राज जगताप, संतोष कदम, संपर्क प्रमुख गिरीश जवळकर,निलेश देवकते, अविनाश विटकर, विकी ठेंगले, मल्लिकार्जुन पोतदार, सागर दासी, सोमनाथ मस्के, द्वारकेश बबलादीकर, बाळासाहेब वाघमोडे, स्वप्नील इराबत्ती, विठ्ठप वाघमोडे, प्रवीण मोरे,आकाश भोसले आदींची उपस्थिती होती.