वाइल्डलाइफ काँझर्वेशन असोसिएशनच्या सदस्यांनी केले बचाव कार्य
सोलापूर:- दि. 01 डिसेंबर रोजी चपळगाव ता. अक्कलकोट, बावकरवाडी येथील शेतकरी संगमेश्वर पाटील यांच्या विहीरीमध्ये दोन साप पडल्याची माहिती त्यांनी WCAS चे सदस्य सचिन पाटील यांना कळविली पाटील यांनी सदर माहिती संतोष धाकपाडे यांना सांगितली.
ही माहिती मिळाल्यानंतर WCA,S चे सदस्य अजित चौहान व संतोष धाकपाडे हे आज दि. 04 डिसें. 2024 रोजी सकाळी 7 वा. बावकरवाडीला रवाना झाले. शेतात पोहोचल्यानंतर विहीरीची पाहणी केली असता त्या विहीरीत घोणस जातीचे दोन विषारी साप त्यांना दिसून आले. परंतू विहीराला पायर्या नसल्याने सापांना रेस्क्यू कसे करायचे हा मोठा प्रश्न दोघांसमोर उभा होता. परंतू यांनी क्षणाचाहि विलंब न करता पोलीस पाटील विजय बावकर यांच्याकडून एका क्रेटची मागणी केली. त्या क्रेटच्या एका बाजूला दोरी व दुसऱ्या बाजूला ड्रीपचे पाईप बांधून ते क्रेट विहिरीत सोडण्यात आले. एका बाजूला तेथील शेतकरी व एका बाजूला WCAS सदस्य यांनी ते क्रेट विहिरीत उतरवले विहीर आकाराने मोठी होती आणि आत पाणी भरपूर असल्याकारणाने विहिरीमध्ये सापांना फिरण्यास मुबलक जागा होती. दोन ते तीन तासाच्या अथक परिश्रमानांतर एकेक करून त्या दोन्ही सापांना क्रेटमध्ये पकडून विहिरीबाहेर काढण्यात आले. विहिरीच्या बाहेर काढल्यानंतर त्याला सुरक्षितरित्या दोन वेगवेगळ्या पिशवीमध्ये बंद करून जवळच त्यांच्या नैसर्गिक अधिवासामध्ये सोडून देण्यात आले.
या बचाव कार्यामध्ये WCAS चे अजित चौहान, संतोष धाकपाडे, बावकरवाडीचे विजय बावकर, सिद्धनाथ बिराजदार, सुरेश इंगोले आदींनी सहभाग घेतला.