सोलापूर : पावसाळा चालू झाला की मानवी वास्तव्याच्या परिसरात साप आढळण्याचे प्रमाण वाढते. पावसाळा सुरू होण्याच्या काळात बऱ्याच जातीच्या सापांचा प्रजनन काळ असतो.
त्याचबरोबर साप राहत असलेल्या बिळामध्ये पावसाचे, नदी नाल्यांचे पाणी साचते. त्यामुळे भक्ष्य व लपण्यासाठी सुरक्षित जागेच्या शोधात सर्प जून ते ऑगस्ट या कालावधीत मानवी वस्तीच्या आसपास आढळून येतात.
सापाबद्दल असलेल्या गैरसमजातून त्यांना मारण्याचे प्रकार घडतात किंवा सर्पदंश झालेल्या व्यक्ती देखील घाबरून मृत्यूमुखी पडतात.
साप..! नुसते नाव काढले तरी अंगाचा थरकाप उडतो. कारण त्याचा एक दंश मनुष्यप्राण्याला मृत्यूच्या दारात उभा करू शकतो. असे लहानपणापासून आपल्या मनावर बिबवलं गेलं आहे. अर्थात तो साप विषारी असेल तर! पण किती आणि कोणते साप विषारी असतात याची माहिती जाणून न घेता आपण प्रत्येकच सापाला विषारी समजून घाबरत असतो. वास्तविकता मात्र वेगळीच आहे. आपल्याकडे आढळणाऱ्या सापांबद्दलची योग्य माहिती जाणून घेतली आणि त्यानुसार सापांबद्दलचे गैरसमज दूर केल्यास निसर्गाचा समतोल राखणारे साप आपले मित्रच असल्याचे पटल्याशिवाय राहणार नाही.
▪️पावसाळ्याची सुरुवात होताच जमिनीत असलेल्या सापांच्या निवासस्थात पावसाचे पाणी शिरल्यामुले साप जमिनीबाहेर पडतात. कोरड्या जागेच्या शोधात अथवा भक्ष्याच्या शोधात घरात किंवा कंपाऊंडमध्ये शिरतात. अशा वेळी सर्पदंशाची शक्यता अधिक असते. त्यामुळे खबरदारी म्हणून पावसाळ्यात बुट वापरणे, शुज पायात घालताना खबरदारी घेणे, अडगळीच्या ठिकाणी हात घालायचे टाळणे, लाईटवरील किडे खाण्यासाठी येणाऱ्या पाली आणि बेडकांच्या शोधात येण्याची सापांची शक्यता असल्याने बाहेर निघताना काळजी घेणे यासारखी जुजबी खबरदारी घेतली तर दुर्घटना टळू शकते.
🛑 साप निघाल्यास काय कराल?
– साप घरात आढळल्यास न घाबरता शांत रहा. सर्पमित्र किंवा वनविभागाच्या १९२६ या टोल फ्री क्रमांकावर फोनकरून तात्काळ संपर्क करावा.
– त्याच्या हालचालीकडे बारकाईने लक्ष द्या.
– सापाजवळ जाण्याचा अथवा छायाचित्र काढण्याचा प्रयत्न करु नये.
🛑 साप येउ नये म्हणून घ्यावयाची काळजी
– घराजवळ पालापाचोळा, कचरा, दगड-विटांचे ढीग, लाकडे रचू नयेत.
– घराच्या भिंतीसह कुंपणाला पडलेली भगदाड,बिळे तात्काळ बुजवून घ्यावीत.
⁃ घराच्या खिडक्या,दरवाज्याशेजारील झाडांच्या फांद्या तोडाव्यात.
⁃ गवतातून चालताना पायात बूट घालावेत. अंधारात बॅटरीचा वापर करावा.
– रात्री जमिनीवर झोपू नये. रात्री वावर असणाऱ्या सापांपासून धोका उद्भवू शकतो.
⁃ साप भिंतीजवळून जात असल्याने जमिनीवर झोपणे अपरिहार्य असल्यास अंथरुण भिंतीलगत न टाकता खोलीच्या मध्यभागी घालावे.
⁃ हालचाल करणाऱ्या वस्तूकडे साप आकर्षित होतो. त्यामुळे अचानक साप समोर आल्यास हालचाल न करता जाग्यावरच स्तब्ध उभे राहावे.