Solapur / सोलापूर
मोटरसायकली वर वाहतूक होणारी 50 लिटर हातभट्टी दारू जप्त
राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
राज्य उत्पादन शुल्क विभागाने शुक्रवारी गुळवंची तांड्याच्या हद्दीत एका मोटरसायकलवरून वाहतूक होणारी 50 लिटर हातभट्टी दारू व 90 किलो गुळ पावडर जप्त केला.
सविस्तर वृत्त असे की, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातभट्टी दारू निर्मिती व विक्री ठिकाणांवर सातत्याने छापे टाकण्यात येत आहेत. शुक्रवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रभारी निरीक्षक सुखदेव सिद यांच्या पथकाने गुळवंची तांडा ते खेड रोडवर सापळा रचून संजय नामदेव राठोड, वय 25 वर्षे, रा. गुळवंची तांडा या इसमाला त्याच्या हिरो होंडा मोटरसायकल क्रमांक MH13 CG 9291 वरून रबरी ट्यूब मध्ये 50 लिटर हातभट्टी दारू व तीन प्लास्टिक पिशव्यांमध्ये 90 किलो गुळ पावडरची वाहतूक करताना पकडले. या कारवाईत आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून त्याच्या ताब्यातून 67,800 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याच पथकाने गुळवंची तांड्याच्या गोशाळेच्या पाठीमागे मोकळ्या जागेतील हातभट्टी अड्ड्यावर छापा टाकून आकाश राजेंद्र चव्हाण, वय 23 वर्षे या इसमाच्या ताब्यातून एका भट्टी बॅरल मधील शंभर लिटर रसायन व चार प्लास्टिक बॅरल मधील 800 लिटर रसायन व एका रबरी ट्यूबमधील 80 लिटर हातभट्टी दारू असा 42 हजार 100 रुपये किमतीचे हातभट्टी दारू बनविण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले. ही कारवाई प्रभारी निरीक्षक सुखदेव सिद, सहायक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर , जवान अनिल पांढरे, इस्माईल गोडीकट व प्रशांत इंगोले यांच्या पथकाने पार पाडली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे नागरिकांना आवाहन
नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्या परिसरातील हातभट्टी दारू, अवैध देशी-विदेशी दारू, ताडी इत्यादीविरुद्ध तक्रार असल्यास या विभागाला संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी केले आहे.