man marathi news,
रिल्स स्टार युवतीचा रिल्स काढताना कड्यावरुन पाय घसरून ३०० फूट खोलदरीत मृत्यू
कड्यावरून पडलेल्या २७ वर्षीय कु आनवी कामदार” हिचा शोध घेण्यासाठी जीवाची बाजी लावून येथील प्रतिकुल परिस्थितीचा सामना करत बचाव कार्य करताना कोलाड, माणगांव, महाड येथील रेस्क्यु टीमचे धाडसी युवा सदस्य दिसत आहेत….
कुंभे येथे इंस्टाग्रामसाठी रील बनवायला गेलेली मुंबई येथील २७ वर्षीय तरुणी पाय घसरून ३०० फूट दरी मध्ये कोसळली… व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटेंट व प्रसिद्ध इंस्टाग्राम सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असलेल्या ”आनवी कामदार” हिचा दरीत पडुन दुर्दैवी मृत्यू
बचाव कार्याचा थरार – बचाव कार्य करणाऱ्यांवरच कोसळत होते दगड – जीव धोक्यात घालून केले बचाव कार्य
रायगड जिल्ह्यातील माणगाव मधील कुंभे आणि देवकुंड हे धबधबे पावसाळी पर्यटनासाठी प्रचलित आहेत, येथे पावसाळी असंख्य पर्यटक येत असतात, त्यात अति उत्साही तरुण तरुणी समाजमाध्यमांवर रील आणि फोटो काढण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता उत्साहाच्या भरात नको त्या धोकादायक ठिकाणी पोहोचतात. अशी घटना, मुंबई येथील चार्टर्ड अकाउंटेंट असेलेली २७ वर्षीय तरुणी “कु.आनवी कामदार” हि आपल्या मित्र मैत्रिणींसोबत मंगळवार दि.१६ जुलै रोजी समाजमाध्यमांवर प्रसिद्ध असलेल्या कुंभे येथील जीवघेण्या कड्यावर इंस्टाग्राम रिल्स बनवण्यासाठी आली होती परंतु तिचा हा प्रवास आणि रील हा दुर्दैवाने तिच्या जीवावर बेतून तिच्या जीवनाचा शेवटचा प्रवास ठरला आहे.
मंगळवार दि.१६ जुलै रोजी सकाळी ९ च्या दरम्यान कड्याच्या टोकावरील अरुंद आणि निसरड्या रस्त्यावरून जात असताना तिचा पाय घसरून ती ३०० फूट खोल दरीत पडली तिच्या सोबत असलेल्या मित्र मैत्रिणींनी ही माहिती जवळील माणगांव पोलीस स्थानकात दिली, माणगांवचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत जवळच्या सर्व बचाव पथकांना बोलावले. कुंभे ग्रामपंचायत सरपंच आणि काही सदस्य, ग्रामपंचायतचे कर्माचारी देखील तातडीने घटनास्थळी पोहोचले, व महावितरणचे कर्मचारी देखील बचाव कार्यासाठी पुढे सरसावत बचाव पथके येण्यापूर्वी खोल दरीचा घेत आढावा घेत होते. विळे येथील शेलार मामा रेस्क्यू टीम देखील तातडीने तेथे पोहोचली परंतु पाऊस आणि अतिशय धुके असल्यामुळे आणि अपुऱ्या उपकरणांमुळे काहीच करणे शक्य होत नव्हते.
सदरची घटना कळताच कोलाड रेस्क्यू टीम चे सागर दहींबेकर त्वरित आपल्या सहकाऱ्यांसोबत निघाले त्यांनी माणगांव येथील वन्यजीव अभ्यासक शंतनु कुवेसकर यांना सदरचा कुंभे परिसर अधिक परिचयाचा असल्यामुळे संपर्क साधला असता ते देखील तातडीने आपल्या सहकार्यांसोबत निघाले. जवळपास दुपारी १ च्या सुमारास येथे पोहोचताच बचावकार्य सुरु कारण्यात आले.
घटनास्थळी पोहोचताच मुलगी कोठे पडली असावी याचा नेमका अंदाज आल्याने शंतनु कुवेसकर व सागर दहींबेकर त्यांचे सहकारी सुरज दहींबेकर आणि शुभंकर वनारसे फक्त सुरक्षा रोप च्या साहाय्याने साधारण १५ मिनिटातच दरीत पडलेल्या मुलींपर्यंत पोहोचले. त्यावेळी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता कदाचित त्या मुलीचे प्राण गेले असावे असे वाटले होते परंतु त्या मुलीचा श्वास चालू होता. चौघांनी मिळूनच मुलीला स्ट्रेचर वरती सुरक्षित बांधले, खोल दरीतून घसरणाऱ्या दगडांमधून ३०० फूट वरती घेऊन जाणे अधिक आव्हानात्मक होते.
त्यात बराच काळ वरून कोणत्याच प्रकारची मदत येत नव्हती व संपर्क देखील नीट होत नव्हता, अंगावर पडणारे दगड आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत अजून दोन सहकारी प्रयाग बामुगडे व शुभयांच्याम सणस तेथे शंतनु कुवेसकर, सागर दहींबेकर, सुरज दहींबेकर आणि शुभंकर वनारसे मदतीस खाली पोहोचले आणि सर्वांनी मुलीला पडलेल्या ठिकाणापासून वरती साधारण १०० फूट अंतर, स्ट्रेचर वर उचलून आणले, त्यानंतर महाड येथील सिस्केप रेस्क्यू टीमचे चिराग मेहता व ओम शिंदे वरून रॅपलिंग करत दरीमध्ये उतरले, त्यामुळे बचावकार्याला अधिक गती मिळाली.
अतिशय प्रतिकूल परिस्थितीत उपलब्ध उपकरणांच्या साहाय्याने तेथून वरती अससेल्या सिस्केप, कोलाड व शेलार मामा रेस्क्यू टीमचे सदस्य व इतर मदतनिसांनी अतिशय जखमी अवस्थेत असलेल्या अनविला स्ट्रेचरसह रोप च्या सहाय्याने वर ओढून काढले. यावेळी तिचा श्वास हळुवार चालू होता, त्यामुळे तात्काळ रुग्णवाहिकेतून तिला माणगांव उपजिल्ह्या रुग्णालयाकडे नेहण्यात आले. परंतु येथे पोहोचण्यापूर्वीच आनवीचे प्राण गेले असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
या दुर्दैवी घटनेच्या संपूर्ण बचावकार्याप्रसंगी माणगांव चे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे , सहाय्य्क पोलीस निरीक्षक नरेंद्र बेलदार व पोलीस सहकारी तसेच माणगांव तहसीलदार विकास गारुडकर व महसूल चे कर्मचारी, तलाठी, मंडळ अधिकारी तसेच कुंभे ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ आनवी ला दरीमधून बाहेर काढेपर्यंत या ठिकाणी उपस्थित होते.